Latest

Truck accident : एस कॉर्नरला अपघात; चालक ठार

Arun Patil

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात (Truck accident) सोमवारी एका ट्रकचा ब्रेकफेल झाला. त्यामुळे ट्रक कठड्यास धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सेवा रस्त्यावरून चाललेल्या दुचाकीस्वाराने हा अपघात पाहिल्यानंतर ट्रकमधील लोखंडी साहित्य पडत असल्याचे दिसून आल्याने दुचाकी सोडून तो बाजूला पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

कोल्हापूर एमआयडीसीमधून इकबाल हमीद व क्‍लिनर निसार दिलावर हे मालट्रक क्रमांक (आर.जे. 02 जी. ए .8377) मध्ये लोखंडी जॉब भरून फरिदाबाद (हरियाणा) येथे निघाले होते. खंबाटकी बोगदा ओलांडत असताना ट्रकमधील एअरप्रेशर कमी झाल्याने ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

बोगद्याबाहेर पडताना ट्रकचा वेग कमी असल्याने चालकाने क्‍लिनरला उडी टाकून चाकापुढे दगड लावण्यास सांगितले. मात्र, दगड शोधताना ट्रक उतारावरून पुढे गेला. उतारामुळे ट्रकचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका काम सुरू असलेल्या ठिकाणी खडीच्या ढिगावर हा ट्रक नेण्याच्या प्रयत्नात संरक्षक कठड्यावर आदळला. या अपघातात केबीनचा चुराडा झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. (Truck accident)

यावेळी सेवारस्त्यावरून धीरज चव्हाण हा युवक दुचाकीवरून निघाला होता. ट्रकच्या धडकेमुळे ट्रकमधील लोखंडी साहित्य सेवा रस्त्यावर फेकले जात असल्याचे पाहिले. धीरज प्रसंगावधान राखत दुचाकी सोडून बाजूला पळाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोनि महेश इंगळे, उपनिरीक्षक शंकर पांगारे, वाहतूक पोलिस विठ्ठल पवार, राजू अहिरराव हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक व विखुरलेले लोखंडी साहित्य बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.

दरम्यान, एस कॉर्नर हा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित झाला आहे . या वळणावर झालेल्या अपघातात 100 हून अधिक बळी घेतले आहेत. पूर्वी या ठिकाणी लोखंडी संरक्षक कठडे होते. मात्र, वारंवार झालेल्या अपघातामुळे ते तुटले. आता याच ठिकाणी सिमेंटचे कठडे बांधल्याने वाहने धडकून अपघातांची संख्या वाढली आहे. नवीन बोगदा व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने अपघातात होणारी हानी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT