राहुल हातोले
पिंपरी : डिसेंबर, जानेवारी महिना म्हटले की, शाळांतून सहलींचे आयोजन केले जाते. आपल्याला एस.टी.बसमधून सहलीस गेल्याची आठवण न आल्यास नवलच. वल्लभनगर आगारातील सुमारे 70 बसेस शालेय सहलींसाठी डिसेंबर महिन्यात बूक झाल्या आहेत; अनेक शाळांचा सहलींशाठी लालपरीला प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनातील लॉकडाऊनमुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांसह घरातील थोरा मोठ्यांनाही सहलींचा आनंद घेता आला नाही. मात्र यानंतर सहलींची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे प्रत्येकाला जीवनाचे महत्त्व कळाल्याने आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यात नागरिकांचा पुढाकार दिसत आहे. सुटीच्या दिवशी कामाचा ताण कमी करण्यासाठी कुटुंबासह पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा बेत आखला जात आहे.
तशातच विद्यार्थिवर्गानेही देखील कोरोना काळात बराच संयम बाळगला. आता मात्र कोरोनाचे सावट कमी झाले असून, हिवाळ्याची सुरुवात झाल्याने शाळांतूनही सहलींचे आयोजन केले जात आहे.
सहलीसाठी पाच शिक्षक अनिवार्य
शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींमध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेण्यासाठी पाच शिक्षक असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सहलींना मान्यता दिली जात नाही.
गैरसुविधा होऊ नयेर याची दक्षता
विद्यार्थ्यांना बसमध्ये अडचण होऊ नये, म्हणून जागेची योग्यरित्या तरतूद करण्यात आली आहे. 12 वर्षाच्या पुढील 40 मुले तर 12 वर्षाच्या आतील 60 मुलांनाच एका बसमध्ये प्रवास करता येईल.
सुटीच्या दिवशी पाच ते सात बस फुल्ल
सुटीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी दिवसाला पाच ते सात बसची बुकिंग फुल्ल होत आहे. यावरून सहलींना उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे.
एस.टी.बसनेच सहल काढण्याचा शासन निर्णय
सुरक्षितता आणि उत्तमसेवा यांमुळे सरकारी शाळांनी आपल्या सहलीसाठी एसटी बसनेच प्रवास करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या सहलींमध्ये अधिक वाढ झाली आहे.
लग्नासाठी दोन बस बूक
डिसेंबर महिन्यात लग्न कार्यासाठी देखील दोन बसेसचे बुकिंग झाले आहे. एसटीला नागरिकांचा प्रतिसाद पाहता, महिनाअखेरपर्यंत आणखी बस बूक होतील, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच शाळेची सहल एका खासगीबसमध्ये गेली होती. त्या बसचा अपघात झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारची सुरक्षितता आणि विम्याची सुविधा मिळाली नाही. याऐवजी एसटीने प्रवास केला असता तर या सुविधा मिळाल्या असत्या.
सुरक्षित आणि उत्तम सेवेमुळे एसटीला प्राधान्य
एसटीची सेवा उत्तम आणि सुरक्षित असल्याने शहरातील नागरिकांनी एसटीला प्राधान्य दिले आहे. तसेच सर्व सरकारी शाळा एसटीलाच प्राधान्य देत आहेत.
सहलींसाठी विशेष गाड्या
सहलींसाठी निघणार्या गाड्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. या गाड्यांच्या मेंटनन्सबाबत विशेष काळजी घेतली जाते. तसेच गाड्यांवरील चालकांचीही योग्यरित्या निवड केली जाते.
सहलींच्या गाड्यांची विशेष तपासणी करून, प्राथमिक उपचार पेटींसह सर्व सुविधा दिल्या जातात. तसेच सुरक्षितता आणि उत्तम सेवा यामुळे सहलींची संख्या वाढली आहे. सरकारी शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
– पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वल्लभनगर डेपो.