कंपवाताची समस्या असणार्यांनी सुवर्णमाक्षिकादी वटी आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या सकाळी आणि सायंकाळी घ्याव्या. झोपताना निद्राकरवटी 6 गोळ्या आणि आस्कंदचूर्ण 1 चमचा दुधाबरोबर घ्यावे. मलावरोध, उदरवात ही लक्षणे असतील तर गंधर्व हरितकी झोपताना घ्यावे. दोन्ही जेवणानंतर सौभाग्य सुंठचूर्ण अर्धा चमचा घ्यावे. बलदायी महानारायण तेलाचा मसाज दोन वेळा करावा.
मानसिक ताण असल्यास सारस्वतारिष्ट चार चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावे. तसेच ब्राह्मी वटी सकाळी आणि सायंकाळी घ्यावी. मानेच्या मणक्याचा किंवा मज्जारज्जूचा दोष असल्यास लाक्षादी गुग्गुळ सकाळी आणि सायंकाळी तीन तीन गोळ्या घ्याव्या.
वाढता रक्तदाब हे कंपवाताचे कारण असल्यास आरोग्यवर्धिनी, शृंग, गोक्षुरादी गुग्गुळ आणि सुवर्णमाक्षिकादी वटी प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा चावून खाव्या. सोबत रसायन चूर्ण एक चमचा घ्यावे. रात्री निद्राकरवटी घ्यावी. कृश व्यक्तींकरिता अश्वगंधा पाक द्यावा. ज्यांना. ज्यांना परवडेल त्यांनी बृहत्वात चिंतामणी रस रोज एक गोळी घ्यावी.
विशेष दक्षता आणि विहार
जागरण, उशिरा झोप कटाक्षाने टाळावी. अंगाला नित्य समाज करावा. उबदार कपडे घालावीत. अतिश्रम टाळावेत. मलावरोध होणार नाही याची काळजी घ्यावी.
पथ्य
जेवण नेहमी गरम, ताजे असावे. थोडी भूक ठेवून रुचकर पदार्थ खावेत. पुदिना, आले, लसूण अशी चटणी वापरावी. भोजनोत्तर सुंठपाणी प्यावे.
कुपथ्य
टोमॅटो, बियांचे पदार्थ, कांदा, चवळी, मटकी, वाटाणा, शेव, भजी, चिवडा, तेलकट आणि तुपकट पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, मेवा-मिठाई व भूक नसताना जेवण टाळावे.
योग आणि व्यायाम
शवासन, अन्नपचन होईल इतकाच माफक व्यायाम, फिरणे ठेवावे. हलक्या हाताने महानारायण तेलाचा मसाज करावा. सर्वांगाला शतावरीसिद्ध तेलाचा मसाज केल्यास फायदेशीर ठरतो. या आजारासाठीचा चिकित्साकाल दीड ते सहा महिने आहे.
वरील उपचारांबरोबरच 'संयमाने स्वास्थ्य' याप्रमाणे किमान जेवण, रात्री उशिरा न जेवणे, ताक, तांदळाची भाकरी खाणे असे पथ्यपालन केल्यास फायदेशीर ठरते. आरोग्याचे सामान्य नियम (विशेषत: भूक, झोप इत्यादी) कटाक्षाने पाळावेत. उगीच चिंता करू नये.