Latest

पुणे : ट्रॅव्हल्स चालकांकडून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची लूट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यातील सुटीत होणार्‍या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत, ट्रॅव्हल्स चालकांनी पुन्हा प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे. प्रवासाकरिता खासगी बसचालक अवाच्या सवा भाडे आकारत नागरिकांची सर्रासपणे लूट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दै.'पुढारी'च्या वतीने रविवारी शहरातील प्रमुख ट्रॅव्हल्स चालकांच्या दुकानांमध्ये जाऊन चौकशी केली असता, ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांकडून अवाच्या सवा दराने तिकिटांची मागणी करीत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आरटीओने याकडे लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे वातानुकूलित भाडेदर…

1) पुणे – नागपूर – 2400 पासून पुढे सुरू
2) पुणे – औरंगाबाद – 750 ते 1200 रुपयांपर्यंत
3) पुणे – बेळगाव – 1800 रुपयांपर्यंत
4) पुणे – हुबळी – 1600 रुपयांपर्यंत
5) पुणे – गोवा – 1800 पासून सुरू
6) पुणे – अहमदाबाद – 1400 पासून सुरू
7) पुणे – नाशिक – 1000 रुपयांपर्यंत

कर्नाटक निवडणुकांमुळे वाढले तिकीट दर

येत्या तीन-चार दिवसांत कर्नाटकातील निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकातील पुणे स्थित नागरिक घरी जात आहेत. त्यामुळे एसटीसह खासगी गाड्यांनासुद्धा गर्दी होत आहेत. याचाच फायदा घेत, काही ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीटदरात वाढ केली आहे.

तर एसटीतून विमा मिळेल…

एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना अचानक अपघात झाला, तर प्रवाशांकरिता विमा रकमेपोटी 5 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, खासगी बसमधून जाताना कोणतीही विम्याची तरतूद नसते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना एसटीच्या बसने प्रवास करण्यावर भर द्यावा, असा सल्ला वाहतूक तज्ज्ञांनी दिला आहे.

सीझननुसार आमचे ट्रॅव्हल्स चालक तिकीट दरात काही प्रमाणात वाढ करतात. मात्र, एसटीच्या तिकीट दराच्या दीडपट तिकीट दरात वाढ करण्याचे आम्हाला अधिकार आहेत. त्यामुळे चालकांनी नियमानुसारच तिकीट दराची आकारणी करावी, प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे
घेऊ नये.
                 – बाबा शिंदे, अध्यक्ष, माल व प्रवासी वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य

एसटीच्या ज्या स्वरूपाच्या वर्गात प्रवासी खासगी बसमध्ये बसणार आहे. त्या वर्गाचे 50 टक्के ज्यादा भाडे आकारण्याची परवानगी खासगी बसचालकांना आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवाशाने तिकिटासह साध्या कागदावर पुणे आरटीओला अर्ज करावा, याबाबत 100 टक्के कारवाई करण्यात येईल.

                             – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT