Latest

अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक; ४८० किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

गणेश सोनवणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई – आग्रा महामार्गाने अवैधरीत्या चोरट्या पध्दतीने लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात वडनेर भैरव पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत ४८० किलो गोमांस व लक्झरी बस असा एकूण ३५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघा आरोपींना चांदवड न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली.

मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग आपरेशनदरम्यान ही कारवाई झाली. मुंबई-आग्रा महामार्गाने लक्झरी बसने गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती होती. त्यानुसार मुंडे यांनी तत्काळ पोलिस पथकासह महामार्गावर गस्त केली. यावेळी मालेगावकडून नाशिककडे लक्झरी बस (एमएच १८, बीझेड १८५४) ही संशयितरीत्या आढळून आली. पथकाने तिचा पाठलाग करीत वडाळीभोई शिवारात बस थांबवून झडती घेतली असता बसच्या डिकीमध्ये ७२ हजार रुपये किमतीचे अंदाजे ४८० किलो वजनाचे गोवंश मांस मिळून आले.

बसचालक शरीफ छोटू शाह (४५, रा. मोगलाई, ड्रायव्हर कॉलनी, धुळे) व क्लीनर युसूफ कुसुबुद्दीन शेख (५८, रा. १०० फुटी रोड, शिफा हॉस्पिटलचे पाठीमागे, धुळे) यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. तागड करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT