Latest

नगर जिल्ह्यातील पाच ‘डीवायएसपीं’च्या बदल्या: चार अधिकारी नव्याने दाखल; नगर ग्रामीणला पाटील, तर मिटके शिर्डीला

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, जिल्ह्यात चार पोलिस अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश काढले आहेत.

राज्याच्या गृह विभागाने 139 उपविभागीय पोलिस अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांसह 143 पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. यात बदली झालेल्या अधिकार्‍यांना नियुक्तीस्थळी तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. नगर ग्रामीणचे पोलिस डीवायएसपी अजित पाटील यांची करमाळा (सोलापूर) उपविभागात बदली झाली असून, त्यांच्या जागी जालना येथून सुनील पाटील यांची नियुक्ती झाली आहे. श्रीरामपूर येथील डीवायएसपी संदीप मिटके यांची शिर्डी उपविभागात डीवायएसपी म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी जिल्ह्याबाहेरून आनंदा महादू वाघ आले आहेत. शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव यांना शेवगावच्या डीवायएसपीपदी पदस्थापना मिळाली आहे. त्याशिवाय नगर जिल्हा जातपडताळणी विभागाचे डीवायएसपी सुनील त्र्यंबक भामरे यांची एसडीपीओ नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. तसेच, भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे संगमनेर येथे डीवायएसपी म्हणून येणार आहेत. हिंगोली ग्रामीणचे डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांची कर्जत विभागात डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे.

नगर जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संपतराव शिंदे यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगरच्या सहायक पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. नगर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक भीमराव नंदुरकर यांची नगर मुख्यालयात डीवायएसपी म्हणून पदोन्नती झाली आहे.

संगमनेरचे 'प्रभारीराज' संपले

पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या बदलीपासून रिक्त असलेल्या व शिर्डी उपविभागाकडे प्रभार असलेल्या संगमनेर उपविभागाला सोमनाथ वाघचौरे यांच्या रूपाने पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. वाघचौरे यांनी यापूर्वी श्रीरामपूर उपविभागात सुमारे दहा महिने व शिर्डीत जवळपास दोन वर्षे आपली कारकीर्द गाजवली आहे. पोलिस दलात वाघचौरे यांची 'दंबग' अधिकारी म्हणून ओळख आहे

SCROLL FOR NEXT