Latest

पुण्यातील कात्रज चौकात अडथळ्यांची शर्यत ! वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिक त्रस्त

अमृता चौगुले

रवी कोपनर

कात्रज(पुणे): तीन महामार्ग, अवजड वाहतूक, उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम, हातगाडी व पथारी व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग, त्यातच पीएमपी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्या कात्रज चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. या ठिकाणी वाहनचालक व नागरिकांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कात्रज चौक ते किनारा हॉटेल यादरम्यानच्या रस्त्यावर व पदपथांवर सर्रासपणे हातगाडी व पथारी व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, ते वाहने रस्त्याकडेला उभी करीत आहेत. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नवीन पीएमपी बसस्थानक व भाजी मंडई परिसरात भाजीपाला, फळ व कापड विक्रेते दुकाने थाटत आहेत. तसेच वाहनांची अनधिकृत पार्किंग व बेशिस्त रिक्षाथांब्यांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे.

वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी कात्रज चौक परिसराची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. या वेळी दत्तनगर रस्ता, चौकातील बसस्थानकासमोर बस न वळवता त्या थेट गुजरवाडी फाटा येथील नवीन बसस्थानकातून वळवून आणाव्यात, प्रवासी बसेपर्यंतच बस चौकातील बसस्थानकात उभ्या कराव्यात. तसेच जेएसपीएमसमोरील बसथांबा मागे घ्यावा, अशा सूचना स्थानिक पीएमपी प्रशासनाला केल्या होत्या.

मात्र, त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे कोंडीत भर पडत आहे. याबाबत कात्रज डेपाचे व्यवस्थापक गोविंद हांडे यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपी प्रशासन, वाहतूक पोलिस, अतिक्रमण विभाग, यांमध्ये समन्वयाचा अभाव असून, एकत्रित नियोजन होणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोंडीची कारणे

  • अवैध रिक्षाथांबे
  • शंभर मीटर अंतरात तीन बसस्थानके
  • पीएमपीच्या बस चौकातच वळविल्या जातात
  • रस्त्यावर व पदपथावर अतिक्रमणे
  • दुचाकी-चारचाकी वाहनांचे पार्किंग

या उपाययोजना आवश्यक

  • परवानाधारक हातगाडी, पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर करावे
  • अनधिकृत हातगाडी, पथारी व्यावसायिकांवर ठोस कारवाई करावी
  • बस सोडण्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करावे
  • जेएसपीएमसमोरील बसथांबा मुख्य स्थानकात स्थलांतर करावा
  • पीएमपी प्रशासनाने बसचालकांना शिस्त लावावी

पीएमपी बसचालक सर्रास नियम मोडतात. वाहतुकीस अडथळा व सिग्नल मोडणार्‍या चालकांवर नियमित कारवाई केली जात आहे. एकापाठोपाठ आठ-नऊ बस आल्यानंतर चालकांकडून सिग्नलचे उल्लघंन होत आहे. मुख्य स्थानकात न जाता चौकातून बस वळविल्या जात आहेत. रिक्षा व अन्य वाहनांच्या अवैध पार्किंगवर कारवाई करण्यात येईल.

           प्रशांत कणसे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

कात्रज चौकातील 80 पथारी व्यावसायिकांची बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित अनधिकृत पथारी व हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई केली जाते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाणार आहे.

                                                     श्रीकृष्ण सोनार,
                                          अतिक्रमण निरीक्षक, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT