सातारा : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. पण पर्यटनाला अनोळखी ठिकाणी जाणे, रिल्स काढणे, धोकादायक ठिकाणे न पाहता त्या ठिकाणी जाणे हा अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावर बेतू लागला आहे. निर्जन ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेणार्यांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे रिल्स तयार करताना आयुष्य धोक्यात घालू नका, असे आवाहन करण्यात येते.
काही दिवसांपूर्वी एकीव धबधबा येथे पर्यटकांच्या वादावादीने पर्यटनास गालबोट लागले. या घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे निसर्ग पर्यटनास जाताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.तसेच घरी आपले स्वकीय वाट पाहत आहेत, हे न विसरता पर्यटन करावे, असे आवाहनही दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी संस्था तसेच स्थानिक पोलिसांकडूनही वारंवार करण्यात येते. पावसाळ्यातील भटकंती करताना सुरक्षेच्या नियमांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हिरव्यागार डोंगररांगा आणि त्यावरून वाहणारे धबधबे, खाली उतरणारे ढग अशा विहंगम दृश्यावेळी फोटोसेशन करताना दरवर्षी अपघाताच्या घटना घडत असतात. धोकादायकरित्या सेल्फी आणि फोटोसेशन केले जाते. मात्र, पर्यटकांचे स्वतःच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशा अपघातांची संख्या वाढत आहे.
अनेक धोकादायक ठिकाणी रिल्स करत असलेल्या तरुणाईला कोणी रोखावे? असा प्रश्न पडत आहे. कारण, पोलिस यंत्रणा आणि पर्यटन विभाग यांचा तसा थेट संबंध येत नाही. पर्यटन विकास महामंडळाने सूचना दिली किंवा पोलिस संरक्षण मागितले तरच ते दिले जाते.
एरवी पर्यटनस्थळांवर पोलिस येत नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात दुर्घटना घडल्यावरच पोलिसांना कळते. यामुळे त्या रिल्सवीरांना आवरण्याची प्रमुख जबाबदारी पर्यटन विकास महामंडळाची आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे.
एकटे फिरायला जात असाल तर त्या ठिकाणाची पूर्ण माहिती घ्यावी. अनेकदा अपघात झाल्यानंतर सोबत कोणी नसल्याने मदत मिळत नाही. रस्ता चुकण्याची शक्यता असते.