Latest

आंबोलीत आता वर्षभर टुरिझम

Arun Patil

आंबोली : काही वर्षांपूर्वी आंबोली हे ठिकाण लगतच्या राज्यांत केवळ वर्षा पर्यटनापुरतेच ओळखले जायचे. मात्र, आता आंबोली टुरिझमच्या माध्यमातून आंबोली जगाच्या पर्यटन नकाशावर आले असून हे एक बारमाही पर्यटनाचे ठिकाण बनले आहे. याबरोबरच नेचर वेडिंग, प्रीवेडिंग, मॉडेलिंग, सोशल मीडिया आदींसह फोटो, व्हिडीओग्राफी, फिल्म व शॉर्टफिल्म्स् शूटिंग यासाठीही आंबोली 'फेव्हरेट डेस्टिनेशन' बनले आहे.

आंबोली म्हणजे कोकणचे महाबळेश्वर. आंबोलीत निसर्गाची विविध रूपे ऋतूनिहाय अनुभवता येतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 670 मीटर उंचीवरील आंबोलीचे हवामान बाराही महिने आल्हाददायक असते. पावसाळ्यात वादळी वार्‍यासह कोसळणारा मुसळधार पाऊस, घनदाट धुके व परिसरातील हिरवळ यामुळे पावसाळ्यात आंबोलीचे सौंदर्य जणू काश्मीरसमान असते. येथील पाऊस सर्वांनाच आकर्षित करतो. कारण, आंबोलीचा पाऊस अंगाशी झोंबणारा व शरीरावर रोमांच उभे करणारा असतो. पावसाळ्यात जागोजागी कोसळणारे धबधबे, धुक्यांनी भरलेल्या हिरव्यागार दर्‍या, जंगल, नद्या असे उत्साही वातावरण असते.

आंबोली परिसराला नैसर्गिक साधन समृद्धीचे व सौंदर्याचे वरदान लाभले आहे. या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर डेस्टिनेशन वेडिंग, नेचर कॉन्फरन्स, ओपन रिसेप्शन व इव्हेंटस्, नेचर वेडिंग, प्रीवेडिंग, मॉडेलिंग, सोशल मीडिया रिल्सकरिता फोटो व व्हिडिओग्राफीसाठी देशभरातील तरुणाईची व कलाकारांची पसंती आंबोलीला मिळत आहे. याबरोबरच विविध मालिका, फिल्म व शॉर्टफिल्म्स् शूटिंगसाठीही आंबोलीही हॉटडेस्टिनेशन बनले आहे.

आपल्या जीवनातील विशेष महत्त्वाचे क्षण हे आंबोलीत छायाचित्रित करण्यास युवा पिढीला जणू भुरळ पडली आहे. येत्या काही वर्षांत आंबोली परिसर डेस्टिनेशन व नेचर फोटो व व्हिडिओ तसेच फिल्म शूटिंगचे फेव्हरेट हॉटस्पॉट बनेल हे निश्चित.

निसर्गाची अद्भुत किमया

जैवविविधतेतील दुर्मीळ व अतिदुर्मीळ वन्यजीव, रानफुले व वनस्पती आदीमुळे निसर्गाची एक अद्भुत किमया आंबोली परिसरात पाहावयास मिळते. थंडीमध्ये आंबोलीचे रूपडे बदलेले असते. घाट व परिसरातील दर्‍यांमध्ये उतरलेले ढग, अंगाला बोचणारी थंडी असे आल्हाददायी वातावरण असते.

नैसर्गिक संपदा एकाच ठिकाणी

हिरव्यागार दर्‍या, धबधबे, धुके, पठारे, रानफुलांचे पठार, नद्या, जंगल आदी ठिकाणे असल्याने एकाच ठिकाणी आंबोलीत नैसर्गिक संपदा उपलब्ध आहे.

SCROLL FOR NEXT