Latest

Ash Barty : ॲश्ले बार्टीचा टेनिसला अलविदा, केवळ २५ वर्षी स्‍वीकारली निवृत्ती!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अव्‍वल मानांकित ऑस्‍ट्रेलियन टेनिसपटू ॲश्ले बार्टीने ( Ash Barty )  आज निवृत्तीची घाेषणा  केली. २५ वर्षी ॲश्लेने  याचवर्षी ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेवर आपली मोहर उमटवली होती. तिने सोशल मीडियावर एक व्‍हिडीओ शेअर करत आपल्‍या निवृत्तीची घोषणा केली.  तिच्‍या या निर्णयाने चाहत्‍यांसह टेनिस जगताला आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे.

बार्टीने इंस्‍टाग्रामवर लिहिलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, 'आजचा दिवस माझ्‍यासाठी अत्‍यंत कठीण आहे. कारण मी टेनिसमधून निवृत्ती घेण्‍याची घोषणा करत आहे. या खेळाने मला जे काही दिले त्‍याबद्‍दल मी आभारी आहे. त्‍याचबरोबर मला गर्वही आहे. मला समर्थन करणार्‍या सर्वांचे आभार'.

Ash Barty :  विम्‍बल्‍डन स्‍पर्धेनंतरच निवृत्तीचे विचार

बार्टीने स्‍पष्‍ट केले की, 'मी टेनिसमधून निवृत्त हाेण्‍याचा विचार अचानक घेतलेला नाही. मागील वर्षी झालेल्‍या विम्‍बल्‍डन स्‍पर्धेनंतर मला निवृत्तीचे वेध लागले. मागील काही दिवस मी या निर्णयावर विचार करत होते. माझ्‍या टेनिस करिअरमध्‍ये काही अविस्‍मरणीय क्षण आले. मागील वर्षी झालेल्‍या विम्‍बल्‍डन स्‍पर्धेनंतर एक खेळाडू म्‍हणून माझ्‍यात खूपच बदल झाला. मी अनेकवेळा माझ्‍या टीमलाही सांगितले की, आता माझ्‍यात पूर्वीसारखी इच्‍छाशक्‍ती राहिलेली नाही. शारीरिकदृष्‍ट्या मी स्‍वत:ला तयार करु शकत नाही. आता यापुढे मी टेनिसमध्‍ये काही करेन, असे वाटत नाही. मी टेनिस या खेळाला माझं सर्वस्‍व अर्पण केले होते. मी खूप आनंदी आहे. माझ्‍यासाठी हेच खरे यश आहे, असेही तिने म्‍हटलं आहे.

बार्टीने यावर्षी जिंकली होती ऑस्‍ट्रेलियन ओपन

ॲश्ले बार्टीने यावर्षी ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धा जिंकली होती. तिच्‍या कारकीर्दीतील हे तिसरे ग्रँड स्‍लॅम ठरलं हाेतं. ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या फायनलमध्‍ये तिने अमेरिकेच्‍या डॅनियल कॉलिंसचा ६-3,७-६ असा सलग दोन सेटमध्‍ये पराभव केला होता. . तब्‍बल ४४ वर्षांनंतर ऑस्‍ट्रेलियाच्‍या महिला टेनिसपटूने अशी कामगिरी केली होती. यापूर्वी तिने २०१९ मध्‍ये फ्रेंच ओपन तर २०२१ मध्‍ये विम्‍बल्‍डन गँड स्‍लॅम जिंकली होती. विशेष म्‍हणजे, ती आजवर ग्रँड स्‍लॅमच्‍या फायनलमध्‍ये हरली नव्‍हते.

बाल वयातच टेनिसचे धडे

ॲश्ले बार्टीचा जन्म क्विन्सलँडच्या इप्सविचमध्ये २४ एप्रिल १९९६ मध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तिने हातात टेनिसची रॅकेट घेतली. ती मुलींच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचली होती. २०११ ला तिने मुलींच्या एकेरीचे विंबल्डन विजेतेपद जिंकले होते. जसजशी बार्टी मोठी होत गेली तिने दुहेरीतही आपला ठसा उमटवला. २०१३ च्या डब्ल्युटीए टूरमध्ये ती तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. त्यावेळी ती अवघ्या १६ वर्षांची होती.

टेनिस सोडून क्रिकेटची बॅट धरली

२०१४ चा हंगाम संपत आला असताना ॲश्ले बार्टीने टेनिसमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला.  तिने टेनिसची रॅकेट सोडली आणि क्रिकेटची बॅट हातात घेतली हाेती. २०१५ ला तिने क्विन्सलँडकडून अ श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.याचबरोबर तिने १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पदही काही काळ भूषवले होते.

माझे यापुढेही टेनिसवरील प्रेम कायम राहिल. माझ्‍या आयुष्‍यातील हा एक महत्‍वाचा टप्‍पा होता. आता यापुढचा टप्‍पाही मला तेवढचा आनंदाने व्‍यतित करायचा आहे. माझ्‍या आयुष्‍यातील पुढील टप्‍पा हा खेळाडू म्‍हणून नव्‍हे तर ॲश्ले बार्टी केवळ एक व्‍यक्‍ती म्‍हणून असेल.

ॲश्ले बार्टी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT