Latest

आज महाराष्ट्राचा 65वा स्थापना दिवस

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणून राज्याची स्थापना होण्याच्या ऐतिहासिक व अव्दितीय क्षणाची उजळणी 1मे रोजी राज्यात सर्वत्र होणार आहे. राज्याचा 65 वा स्थापना दिवस राज्यभर व मराठी माणूस राहत असलेल्या नवी दिल्लीसह इतर ठिकाणीही जल्लोषात साजरा होणार आहे.

स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा दादर येथील शिवाजी पार्क येथे बुधवारी पार पडणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस हे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत. मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून 8 वाजता तसेच आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन सकाळी 9 वाजता प्रसारित केला जाणार आहे.

जिल्ह्यांच्या मुख्य कार्यक्रमात संबंधित पालकमंत्री अथवा मंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण करणारे मंत्री अथवा लोकप्रतिनिधी काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी पोहोचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकार्‍यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिन समारंभास निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.

जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 च्या पूर्वी अथवा सकाळी 9च्या नंतर आयोजित करण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिना निमित्ताने राज्यभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुंबई, विभागीय मुख्यालये, जिल्हा मुख्यालये, उपविभागीय मुख्यालये, तहसील मुख्यालये तसेच इतर ठिकाणी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ एकाचवेळी सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात येईल, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT