पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित संदेशखाली महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक करण्यात आली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर 24 परगणामधील मिनाखान भागातून शेख याला अटक केली.
शेख शाहजहान याला पोलिसांनी बशीरहाट कोर्टात हजर केले. त्याला त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचे लैंगिक शोषण आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक करा, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी प. बंगाल सरकारला दिले होते.
पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणी दाखल याचिकांवरील काेलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने आरोपीवर कारवाईस झालेल्या दिरंगाईबाबत सरकारला फटकारले होते. तसेच या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासालठी चार वर्षे लागली आहेत," असेही न्यायालयाने सुनावले होते.