पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना काल (रविवारी) सलमान खानचा 'टायगर 3' Tiger 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मोहन चित्रपटगृहात रविवारी रात्रीच्या शोमध्ये सलमानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी थेट चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. जवळपास 10 मिनिटे विविध फटाके उडवले गेले. या घटनाक्रमामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. या प्रकारानंतर सलमान खानने आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे, "स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित राहा." (Tiger 3)
मालेगाव शहरात सलमान खान, आमीर खान, शाहरुख खान, संजय दत्त, मिथूनच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. संबंधितांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यास चाहत्यांची चांगलीच गर्दी होते. दिपावलीच्या दिवशी सलमानचा 'टायगर 3' प्रदर्शित झाला. बर्याच महिन्यानंतर भाईचा सिनेमा आल्याने चाहत्यांमध्ये जल्लाषाचे वातावरण होते. सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या काही चाहत्यांनी सलमानच्या मोठ्या पोस्टरला केक खाऊ घातला, तर कोणी ढोलताशे घेवून थिएटरपर्यंत पोहोचले होते. नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी झाली होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही चाहत्यांनी वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली. सुतळी बॉम्बसह इतर फाटाके फोडले. यामुळे अन्य प्रेक्षकांची धांदल उडाली. जवळपास 10 मिनिटे फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करीत होते. या हुल्लडबाजीची चित्रफित समाजमाध्यमांवर पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रात्री साडेअकरा वाजता पोलीस चित्रपटगृहात दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाचा बंबही पोहोचला. गर्दीत संशयितांना ओळखणे अवघड झाले होते. या गोंधळामुळे काही प्रेक्षक आधीच बाहेर पडले होते. हुल्लडबाजी टाळण्यासाठी अखेर खेळ बंद करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच चित्रपटगृहात गेल्या महिन्यात शाहरुख खानच्या Tiger 3 चित्रपटावेळी अशीच हुल्लडबाजी प्रेक्षकांनी केली होती.
थियटरमधील प्रकारानंतर सलमान खानने आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे, " मी टायगर 3 च्या दरम्यान थिएटरमध्ये केलेल्या फटाक्यांबद्दल गोंधळाबद्दल ऐकत आहे. हे धोकादायक आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित राहा."
हेही वाचा