Latest

संगमनेर : टँकर-मोटारसायकल धडकेत सामान्य कुटुंबातील तीन तरुण ठार

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकल-टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू झाला. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोल्हार-घोटी महामार्गावर मंगळापूरनजीक शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 20), नीलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही रा. चिखली, ता. संगमनेर) अशी मृत झालेल्या तिघा तरुणांची नावे आहेत. संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौघे तरुण एकमेकांचे मित्र असून ते दुचाकीवरून संगमनेरहून चिखलीच्या दिशेने घराकडे निघाले होते. अकोल्याकडून आलेल्या दुधाचा टँकर-दोन्ही दुचाकींची धडक झाली. अपघातात दुचाकींवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहेे.
धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. काहींनी संगमनेर शहर पोलिसांना माहिती कळविली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने आणि दूध टँकरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

तिन्ही मृत तरुण सामान्य कुटुंबातील..!
अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघे तरुण सामान्य कुटुंबातील होते. ऋषीकेश उमाजी हासे एकुलता एक होता. चिखली बस थांब्यावर चहाचे दुकान चालवून वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ऋषीकेशने 12 वीचा शेवटचा पेपर दिला होता. सुयोग बाळासाहेब हासे याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. तो खासगी क्षेत्रात सेवेत होता. वडिलाचे सायकल पंक्चरचे दुकान आहे. निलेश बाळासाहेब सिनारे हा शेतकरी कुटुंबातील होता. तो पोलिस भरतीची तयारी करीत होता. तिन्ही तरुणांवर काळाने एकाचवेळी अचानक झडप घातल्यामुळे कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे.

हळदीला न जाताच निघाले होते माघारी
समनापूर येथे मित्राच्या हळदी समारंभाला जाण्यासाठी ऋषिकेश हासे, निलेश सिनारे, सुयोग हासे आणि संदीप केरे हे चौघे मित्र चिखली येथून मोटरसायकलने निघाले. संगमनेर येथे मित्राच्या दुकानावर काही वेळ ते थांबले. हळदीला समनापुर येथे न जाता ते पुन्हा गावाकडे माघारी निघाले. संगमनेर-अकोले रोडने चिखलीकडे जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT