Latest

परभणी : तीन सख्खे भाऊ एकाचवेळी पोलीस दलात निवड; बालपणी आई-बापाचे छत्र हरपूणही यशाला गवसणी

अमृता चौगुले

परभणी: प्रवीण देशपांडे : माखणी (ता.गंगाखेड) सारख्या डोंगरी भागात जमीन जुमला नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजूरी करणार्‍या कुटुंबात चार मुले असल्याने सातत्याने असलेल्या आर्थिक विवंचनेतून कुटूंब प्रमुखाने पत्नीसह जीवनयात्रा संपवली. त्यानंतर चार मुलांच्या पालनपोषणाचा निर्माण झालेला प्रश्‍न त्यातीलच मोठया असलेल्या भावाने उचलला. मातृ-पितृ छत्र हरवल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत मोठया भावाच्या खंबीर साथीने तिन्ही सख्ख्या भावंडानी संघर्ष करीत शिकत राहिली. त्यांच्या या संघर्षाने यशाला गवसनी घालत एकाचवेळी पोलिस दलाच्या सेवेत प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या संघर्षमय वाटचालीतून मिळविलेल्या यशामुळे ही भांवडे कौतुकास पात्र ठरली आहेत.

माखणी येथील केशवराव शिसोदे हे पत्नी व चार मुलांसह गावात वास्तव्यास होते. स्वत:ची जमीन नसल्याने इतरांच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवित होते. मात्र सातत्याने आर्थिक विवंचना तोंड द्यावी लागे.या विवंचनेतूनच 2012 मध्ये केशवराव यांनी पत्नीसह जीवनयात्रा संपविली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर खाली जमीन व वर आकाश अशी पोकळी या चार भावांच्या आयुष्यात निर्माण झाली. सर्वात मोठा मुलगा आकाशने पालकत्वाची भूमिका स्विकारत मोलमजूरी करून या तिघांना शिकविण्याचा निर्धार केला. (परभणी)

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कृष्णा तसेच आकार आणि ओंकार या जुळया भावांना परभणीतील भारत भारती या शाळेत प्रवेश देताना त्यांच्या निवासाची व्यवस्था खानापुर फाटा येथील एका आश्रमशाळेत केली. कृष्णा दहावीपर्यंत तेथे शिकला मात्र आकार व ओंकार हे दोघे सातवीला असतानाच ती आश्रमशाळा बंद पडली. त्यामुळे या दोघांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला. (परभणी)

दरम्यान येथील डॉ.रामेश्‍वर नाईक हे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळयाच्या निमित्‍ताने माखणी या गावी गेले असता त्यांना शिसोदे कुटूंबीयांबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तातडीने परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेचे मुख्याध्यापक नितीन लोहट यांना दुरध्वनीवर आकार व ओंकारच्या शिक्षणाबद्दल माहिती दिली. त्यावर लोहट यांनीही त्यांच्या संस्थेत सुरू असलेल्या आधार शिक्षणाचा या उपक्रमांतर्गत या दोघांच्या शिक्षण, निवास, भोजन, संगोपनाची तयारी दर्शविली. आठवी ते बारावीपर्यंत विनाशुल्क शिक्षण या दोघांनी जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेत घेतले.

या दरम्यानच सातत्य व कठोर मेहनतीच्या जोरावरच आकार व ओंकार हे दोघेही नुकत्याच झालेल्या पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत निवडले गेले आहेत. मोठा भाऊ कृष्णा याने देखील दहावीनंतर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात व नंतर पुण्यात शिक्षण घेत महावितरणमध्ये अ‍ॅप्रेटीसशिप पुर्ण करताना पोलिस भरतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कृष्णा व आकार या दोघांची मुंबई पोलिस दलात तर ओंकारची परभणी पोलिसांत निवड झाली आहे.

मोठया भावाने निभावले पालकत्व

गावाकडे राहून इतरांच्या शेतात मोलमजूरी करताना आकाश शिसोदे या मोठया भावाने या तिघांना प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण देत वडिल भावाची भुमिका खरत्या अर्थाने निभावली. तिन्ही सख्खे भाऊ पोलिस दलात दाखल झाले असले तरी आकाश मात्र आजही गावाकडे सालगडी म्हणून काम करतात. तिघांना मिळालेल्या यशाचा त्यांना अतीव आनंद आहे.

जिजाऊंचा ३०० मुलांना लाभ

परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने मराठवाडयातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याचे काम आधार शिक्षणाचा या शिर्षकाखाली 2012 पासून सुरू केले आहे. आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त मुलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसह मुलींसह निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्याबरोबरच त्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य व इतर व्यवस्थापनाचा खर्च संस्थेमार्फत केला जातो. या योजनेचा लाभ घेवून आजवर अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, टपाल खाते, शिक्षक, पोलिस भरतीत दाखल झाली आहेत. त्यांना आयुष्यामध्ये सन्मानाने उभी राहण्याची संधी संस्थेने निर्माण करून दिल्याचे संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोहट यांनी पुढारी शी बोलताना सांगितले.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT