Latest

पुणे : गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मुंढवा येथील एबीसी रस्त्यावरील पूनावाला बिल्डिंगमध्ये असलेले गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा दूरध्वनी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण कार्यालय आणि परिसराची तपासणी केली असता, असा कोणताही प्रकार आढळून आला नाही.

मुंबई पोलिसांच्या पथकाने दूरध्वनी करणार्‍या संशयिताला हैद्रराबाद येथून ताब्यात घेतले. पनयम बाबू शिवानंद असे त्याचे नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास मुंबई येथील गुगलच्या कार्यालयात कॉल करून त्याने पुण्यातील ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती. पनयम याच्या विरुद्ध बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात एका बहुमजली व्यावसायिक इमारतीमध्ये अकराव्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. गुगलने दूरध्वनीची ही बाब तातडीने मुंबई पोलिसांना कळविली. मुंबई पोलिसांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर मुंढवा पोलिस तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) गुगलच्या कार्यालयात पोहोचले. पोलिसांच्या पथकाने संपूर्ण कार्यालय, इमारत आणि परिसराची तपासणी केली. तपासणीत संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून दूरध्वनी करणार्‍याचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा दूरध्वनी हैद्राबाद परिसरातून करण्यात आल्याचे उघडकीस आले. हैद्रराबाद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. दूरध्वनी करणार्‍या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद आहेत. भावाला त्रास व्हावा म्हणून त्याने हा धमकीचा कॉल केल्याचे समोर आले आहे.

कॉल करायचा होता एकीकडे लावला भलतीकडे
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पनयम याचा भाऊ पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करतो. त्याच्या कंपनीचे नाव आणि धमकीचा फोन करण्यात आलेले गुगल कंपनीचे नाव त्याला सारखेच वाटले. त्यामुळे त्याने तेथे कॉल न करता गुगलच्या कार्यालात बॉम्ब ठेवल्याचा कॉल केला, असे पुढे आले आहे.

गुगल कंपनीच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा कॉल आला होता. बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली. असा कोणताही प्रकार आढळून आला नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कॉल करणार्‍या एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचे समोर आले आहे.

                                        विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, पुणे शहर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT