कोल्हापूर, एकनाथ नाईक : झिका व्हायरसचे तीन रुग्ण इचलकरंजी येथे आढळल्याने खळबळ माजली असून या तिघांनी एका खासगी प्रयोग शाळेतून तपासणी करून घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन एनआयव्ही पुणे येथे पुढील तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने पाठविले आहेत; पण झिका व्हायरस पसरतो कसा? त्याची लक्षणं काय? त्यापासून बचाव कसा करायचा, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
झिका हा विषाणूूमुळे होणारा सौम्य आजार आहे. संक्रमित एडिस डासांमुळे त्याचा प्रादुर्भाव होतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. एडिस इजिप्त व एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याद्वारे तो मानवी शरीरात प्रसारित होतो. त्याशिवाय झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैगिंक संबंध, रक्तसंक्रमण आणि गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान संक्रमित आईपासून तिच्या बाळामध्ये तो पसरू शकतो. हा आजार विषाणूसारखा असला, तरी तो वेगाने पसरत नाही. झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे डासांपासून संरक्षण होय.
काय आहेत लक्षणे?
झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णास कोणतीच लक्षणे जाणवत नाहीत. जेव्हा लक्षणे आढळतात, तेव्हा ती बहुतांश सौम्य असतात. यात ताप, पुरळ, सांधेदुखी, स्थायू दुखणे, डोकेदुखी व डोळे लाल होणे या लक्षणांचा समावेश असतो. झिकाची लागण झाल्यानंतर दोन ते सात दिवसांनी लक्षणे दिसतात. ती पुढे एक आठवड्यापर्यंत टिकून राहतात.
अशीही गुंतागुंत
झिकाचा संसर्ग गर्भवती तसेच नवजात बाळांवर गंभीर परिणाम करू शकतात. गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास बाळामध्ये मायक्रोसेफलीसारखे जन्मजात दोष, इतर न्युरॉलॉजिकल विकार होऊ शकतात. त्यामुळे गुइलेत बॅरे सिंड्रोमचा धोका वाढतो. हा दुर्मीळ आजार आहे. या आजारात स्नायू कमकुवत होतात आणि अर्धांगवायू होऊ शकतो.
पुरंदरमध्ये राज्यातील पहिला रुग्ण
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला आहे. 50 वर्षांच्या महिलेला या विषाणूचा ससंर्ग झाला होता. 2020 ते 2021 मध्ये भारतात सर्वप्रथम केरळमध्ये झिकाचे तब्बल 14 रुग्ण आढळले होते.
उपाय महत्त्वाचेच
संसर्ग रोखायचा असेल, तर डासांपासून संरक्षण करावे.
गर्भवती किंवा गरोदर होण्याची योजना आखलेल्या महिलांनी झिका विषाणूचा संसर्ग असलेल्या भागात जाणे टाळावे. संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट अँटिव्हायरल उपचार नाहीत; पण विश्रांती घेणे, हायड्रेट राहणे हाच उपाय आहे.