Latest

नागपुरात हजारो मतदार मतदानापासून वंचित; आ. खोपडेंनी प्रशासनावर फोडले खापर

अनुराधा कोरवी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील लोकसभा निवडणुकीत झालेले 54.11 टक्के मतदान सत्तारूढ आणि विरोधकांना अस्वस्थ करणारे आहे. कडक ऊन, मतदान व सरकारविरोधात अनास्था, याद्यांमध्ये गोंधळ अशी कारणे दिली जात आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकार्‍यांशी संवादातून याबाबत चिंता व्यक्त केली असताना आता नागपुरात सर्वाधिक मतदान झालेल्या पूर्व नागपूरच्या भाजप आमदारांनी प्रशासनावर खापर फोडले आहे.

आमदार कृष्णा खोपडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अनेक मतदारांना मतदान कार्ड असूनही बीएलओच्या बोगस कारभारामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले. जिल्हाधिकार्‍यांनी मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले खरे; मात्र त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व बीएलओने त्यांच्या सर्व आदेशांना केराची टोपली दाखविली व मनमर्जी कारभार करून शहरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले. याला जबाबदार कोण, असा सवालही खोपडे यांनी केला आहे.

मतदान केंद्रांवर गैरसोय

अनेक मतदान केंद्रांवर शासनाकडून मतदारांसाठी कसलीही सोय नव्हती. अनेक केंद्रांवर मतदार उन्हात उभे असताना दिसले. पिण्याच्या पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. मतदान फार मंदगतीने होत असल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले.
मतदान केंद्रावर पेंडालची व्यवस्था नव्हती. ज्यांना मतदान केंद्रावर सोय करण्याचे काम दिले, त्यांची चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही आ. खोपडे म्हणाले.

SCROLL FOR NEXT