Latest

bollywood sequels : बॉलीवूडसाठी यंदाचे वर्ष सिक्‍वेल्सचे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूडसाठी 2022 या वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. तथापि, हे वर्ष सिक्‍वेल्सचे वर्ष ठरणार आहे. तसे पाहिले तर दरवर्षी सिक्‍वेल्स येतच असतात; पण या वर्षात अनेक चित्रपटांचे सिक्‍वेल्स प्रदर्शित होणार आहेत. कोणकोणते आहेत हे सिक्‍वेल्स, त्यावर एक नजर…

केजीएफ चॅप्टर-2

कन्‍नड सुपरस्टार यशच्या 'केजीएफ चॅप्टर वन' या चित्रपटाने किंग खान शाहरूखच्या 'झीरो'ला बॉक्सऑफिसवर लोळवले होते. या बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्‍वेलची प्रतीक्षा गेल्यावर्षीपासून आहे. 14 एप्रिल रोजी हा चित्रपट येत असून यात संजय दत्त, रविना टंडन यांच्याही भूमिका आहेत.

भूलभुलैय्या-2

दिग्दर्शक अनीस बझ्मी 2007 मध्ये आलेल्या 'भूलभुलय्या'चा सिक्‍वेल बनवत आहेत. पूर्वीच्या चित्रपटात अक्षयकुमार, विद्या बालन, शायनी अहुजा होते. नव्या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू आहेत. 25 मार्च रोजी हा चित्रपट रीलिज होणार आहे.

बधाई हो

आयुष्मान खुराणा, सान्या मल्होत्रा, नीना गुप्‍ता, गजराज राव यांचा 2018 मधील हिट चित्रपट 'बधाई हो'चा हा सिक्‍वेल आहे. नव्या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर आहेत. 4 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.

एक व्हिलन रिटर्न

2014 मध्ये आलेल्या 'एक व्हिलन'चा हा सिक्‍वेल. सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखच्या भूमिका आधीच्या चित्रपटात होत्या. नव्या चित्रपटात दिशा पाटनी, जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर आहेत. 8 जुलै रोजी हा चित्रपट रीलिज होत आहे.

गदर-2

सनी देओल, अमिषा पटेल यांच्या 'गदर ः एक प्रेमकथा'या चित्रपटाने 2001 मध्ये आमीर खानच्या 'लगान'ला बॉक्सऑफिसवर मागे टाकले होते. सध्या या चित्रपटाच्या सिक्‍वेलचे शूटिंग सुरू असून या वर्षाच्या अखेरपर्यंत तो रीलिज होऊ शकतो.

हीरोपंती-2

2014 मध्ये 'हीरोपंती'मधून टायगर श्रॉफने पदार्पण केले होते. त्या चित्रपटाचा हा सिक्‍वेल असून यातही टायगरचा अ‍ॅक्शन अवतार आहे. सोबत तारा सुतारियादेखील आहे. 29 जुलै रोजी हा चित्रपट रीलिज होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT