Latest

कर्नाटक काँग्रेसमध्ये फेरबदल? : दिल्ली बैठकीत होणार निर्णय

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कर्नाटक काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी सतीश जारकीहोळी, ईश्वर खांड्रे आणि रामलिंगा रेड्डी हे तिघे मंत्रीही असून त्यांनी कार्याध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलीम अहमद आणि बी.एन. चंद्रप्पा हे आणखी दोन कार्यकारी अध्यक्ष आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, काँग्रेसचे नेते 2 ऑगस्ट रोजी वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन संघबांधणी करण्याची शक्यता आहे. आमच्यापैकी बरेचजण मंत्री झाले आहेत. आम्ही पक्षाच्या कामाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नवीन टीम तयार करणे अपरिहार्य असेल आणि 2 ऑगस्टच्या बैठकीत हाच विषय महत्त्वाच्या विषयांपैकी एक असू शकतो. लोकसभा निवडणुकीसाठी काही मंत्र्यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते.

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी माझे नाव चर्चेत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच.सी. मुनियप्पा यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र त्याची पुष्टी झालेली नाही, असेही जारकीहोळी म्हणाले. अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी करताना आमदारांनी संयम बाळगावा. आमदारांच्या सर्व मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत. सर्व 40 विभागांमध्ये अनेक अधिकार्‍यांनी त्यांच्या बदलीनंतर न्यायालयातून स्थगिती आणली आहे. बदल्यांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जाऊ शकतात. राज्य सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा आमदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आतापर्यंत समन्वय समिती स्थापन करण्याची गरज नाही. काही आमदारांना समस्या असतेच, आम्हीच त्यावर उपाय शोधणार आहोत. त्यासाठी समन्वय समिती स्थापन होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

SCROLL FOR NEXT