वॉशिंग्टन : पृथ्वीवर एके काळी अनेक प्रकारचे डायनासोर वावरत होते. काही शाकाहारी व महाकाय होते तर काही मांसाहारी होते. काही आकाशात उडणारे होते तर काही समुद्रात वावरणारे होते. आता संशोधकांनी 7 कोटी 20 लाख वर्षांपूर्वीच्या अशाच महाकाय 'वाकायामा सरयू'चा शोध लावला आहे. जपानी भाषेतील या मूळ नावाचा अर्थ 'निळा ड्रॅगन'. या प्राण्याला संशोधकांनी असे 'ब्ल्यू ड्रॅगन' नाव दिले आहे. एकेकाळी प्रशांत महासागरात या प्राण्याचा मोठा दबदबा होता. तो अतिशय घातक शिकारी होता असे संशोधकांनी म्हटले आहे.
हा 'मोसासोर' क्रेटेशियस काळाच्या अखेरच्या टप्प्यातील प्राणी आहे. तो आता लुप्त झालेला एक मोठा सागरी सरिसृप होता. त्याचे नाव जपानच्या वाकायामा प्रांतावरून ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी त्याचे जीवाश्म सापडले आहे. सिनसिनाटी विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक ताकुया कोनिशी यांनी काही आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या सहाय्याने याबाबतचे संशोधन केले. त्याची माहिती 'पेलियोन्टोलॉजी' जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चिनी लोककथांमध्ये ड्रॅगन हा काल्पनिक प्राणी आकाशात उडणारा दाखवला आहे तर जपानी लोककथांमध्ये तो समुद्रात राहणारा आहे. या मोसासोराला पाहून जपानी संशोधकांना त्या ड्रॅगनची आठवण झाली. या मोसासोराचे जवळजवळ पूर्णावस्थेतील जीवाश्म 2006 मध्ये अकिहिरो मिसाकी यांनी शोधले होते. त्यावेळेपासून त्याचा अभ्यास केला जात आहे. या मोसासोरामध्ये अनेक थक्क करणारी वैशिष्ट्ये होती. त्याचे डोके मगरीसारखे होते तसेच त्याला मोठे फ्लिपर्स होते.
मागील बाजूचे फ्लिपर्स हे पुढील फ्लिपर्सपेक्षा मोठे होते. हे मोठे पर त्याला डुबकी घेण्यासाठी व वेगाने पोहण्यासाठी मदत करीत असत. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठीही त्याला त्यांची मदत होत असे. त्याची शेपूटही अतिशय शक्तिशाली होती. कोनिशी हे गेल्या पंधरा वर्षांपासून या मोसासोरवर संशोधन करीत आहेत्त. त्यांनी म्हटले आहे की प्रशांत महासागरातील या 'निळ्या ड्रॅगन'ची नजरही दुर्बिणीसारखी तीक्ष्ण होती. तो अतिशय खतरनाक शिकारी होता हे उघडच आहे. त्याचे पर ग्रेट व्हाईट शार्कची आठवण करून देणारे आहेत. त्याची लांबी पाच फुटांपेक्षाही अधिक होती.