Latest

राज्यावर पाणीबाणी ओढविण्याची दाट शक्यता!

Arun Patil

कोल्हापूर, सुनील कदम : राज्यात मान्सून लांबण्याची हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलेली शक्यता आणि राज्यातील प्रमुख धरणांनी गाठलेला तळ विचारात घेता दमदार पावसाला सुरुवात होईपर्यंत जूनमध्ये काहीकाळ राज्यावर पाणीबाणी ओढविण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

पावसाळा सुरू व्हायला अजून आठ-पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र आजघडीला राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मराठवाड्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचे असलेले उजनी धरण कोरडेठाक पडले आहे, तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या कोयना धरणात फक्त साडेआठ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील काही प्रमुख धरणांमध्ये तर केवळ एक-दोन टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 13.59 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जूनच्या मध्यापासून मान्सूनला सुरुवात होईपर्यंत राज्याच्या काही भागात पाणीबाणी ओढविणे शक्य आहे.

राज्यात सध्या 139 मोठ्या, 260 मध्यम आणि 2594 लहान अशा एकूण 2993 धरणांमध्ये मिळून एकूण 10735.67 दशलक्ष घनमिटर (379 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 26.64 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 28.97 टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते.

जलसंपदा विभागाच्या अमरावती विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 262 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1445.83 दशलक्ष घनमिटर (51 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 38.40 टक्के आहे. राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येते.

औरंगाबाद विभागात विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 920 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 2194.60 दशलक्ष घनमिटर (77 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 30.21 टक्के आहे.

कोकण विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 173 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1213.51 दशलक्ष घनमिटर (42 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 34.43 टक्के आहे.

नागपूर विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 383 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1792.13 दशलक्ष घनमिटर
(63 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 38.91 टक्के आहे.

नाशिक विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 535 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1666.22 दशलक्ष घनमिटर
(58 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 28.09 टक्के आहे.

पुणे विभागात धरणांची संख्या जादा असली तरी पाणीसाठ्याची टक्केवारी कमी दिसून येत आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 720 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 2423.40 दशलक्ष घनमिटर (85 टीएमसी) पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 20.05 टक्के आहे.

सध्या उजनी धरण कोरडे पडले आहे, तर कोयनेत अवघा 8 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे नजिकच्या काही दिवसांत कोयनेतून होणार्‍या वीज निर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे प्रमुख धरणांनी तळ गाठल्यामुळे आगामी काही दिवसांत शेती आणि औद्योगिक वापरासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची शाश्वती दिसत नाही. उलट राज्याच्या काही भागातील नद्यांवर उपसाबंदी लागू होण्याचीही शक्यता आहे. मान्सूनचे आगमन होऊन दमदार पासाला सुरुवात घाल्यावरच यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणी साठा!

उजनी : शून्य टक्के पाणीसाठा, कोयना : 8.55 टक्के (8.56 टीएमसी), चांदोली : 20 टक्के (5.5 टीएमसी), टेमघर : 4.11 टक्के (0.15 टीएमसी), पानशेत : 14 टक्के (1.59 टीएमसी), निरा देवधर : 13.01 टक्के (1.52 टीएमसी), चासकमान : 8.11 टक्के (0.62 टीएमसी), भाटघर : 5.81 टक्के (1.36 टीएमसी), राधानगरी : 18.48 टक्के (1.43 टीएमसी), काळमवाडी : 2.91 टक्के (0.69 टीएमसी), तिलारी : 11.15 टक्के (0.33 टीएमसी), तुळशी : 28.61 टक्के (0.92 टीएमसी), दारणा : 32.23 टक्के (2.30 टीएमसी), गंगापूर : 38.11 टक्के (2.14 टीएमसी), गिरणा : 23.61 टक्के (4.36 टीएमसी), मांजरा : 25.10 टक्के (1.56 टीएमसी). (राज्यातील एकाही धरणामध्ये आज 8 टीएमसीपेक्षा जादा पाणीसाठा नाही.)

SCROLL FOR NEXT