Latest

सोलापूर : उजनी धरण आज येणार प्लसमध्ये

दिनेश चोरगे

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : संथगतीने का होईना उजनी धरण मंगळवारी (1 ऑगस्ट) मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिकार्‍यांकडून वर्तवली जात आहे. उजनी प्लसमध्ये येणार असल्याने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रथमच यंदाच्या पावसाळी हंगामात उजनी धरणाच्या पाणलोटच्या धरणसाखळी क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे, तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाली आहे. 19 धरणांच्या पाणलोट भागातील पावसामुळेे त्यापैकी 7 धरणांतून 11,255 क्यूसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.

वडज (1708 क्यूसेक), कलमोडी (812 क्यूसेक), कासारसाई (400 क्यूसेक), येडगाव (1708 क्यूसेक), चिल्हेवाडी (2146 क्यूसेक), चसकामान (3625), खडकवासला (856 क्यूसेक) या धरणातून आवक सुरू आहे. उजनीला प्लसमध्ये येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला. गतवर्षी उजनी धरण 12 जुलै 2022 रोजी प्लसमध्ये आले होते. त्यापूर्वीही चार वर्षे जुलैमध्येच धरण प्लसमध्ये राहिले.
सध्या उजनीतून सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये 13767 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. यावर्षी उजनीच्या पाण्याचे विस्कळीत नियोजन झाल्याने उजनी मायनसची पातळी -35.99% पर्यंत खाली आली होती. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा सुटणार की नाही ही चिंता सर्वांनाच लागली होती. उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वाढवलेले पाईप, मोटारी, केबल पाण्यात जाऊ नये यासाठी त्या बाजूला करण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असल्याचेे चित्र उजनी काठावर दिसून येत आहे.

उजनीची पाणीपातळी

(सोमवार दुपारी 4 पर्यंत)
एकूण पाणीपातळी – 490.900 मीटर
एकूण पाणीसाठा – 1777.28 द.ल.घ.मी. ( 62.76 टी.एम.सी)
उपयुक्त साठा -25.53 द.ल.घ.मी.
उपयुक्त साठा -0.90 टी.एम.सी.
टक्केवारी -1.68 टक्के
आवक : दौंड – 13767 क्यूसेक
बंडगार्डन -9050 क्यूसेक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT