Latest

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा नागपुरात

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जगातील सर्वात मोठा (Worlds Largest Statue) सिंहासनारूढ भव्य पुतळा नागपुरात उभारला जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बागस्थित जागेवर हा पुतळा उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे. सोमवारी (दि. ८) याविषयीच्या पत्रकाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते अनावरण झाले.

विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांन्झ या धातूचा असून त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म आणि त्यांची प्रजाहितवादी दृष्टी आजही प्रेरणादायी आणि लक्षवेधी ठरणारी आहे. त्यांचा आदर्श आजही महाराष्ट्रातील मनामनात कायम आहे. विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर निघणारा विद्यार्थी हा केवळ शैक्षणिक पदवी घेऊन जाणारा नसावा तर छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पकता, विजयश्री, कुशल प्रशासक, राष्ट्रप्रेम, धार्मिक सहिष्णुता, नैतिकता ही मूल्य घेऊन जाणारा असावा. केवळ याच एका उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पूर्ण पुतळा उभारण्यात येत आहे. महाराजांचा हा पुतळा छत्रपती शिवाजी स्मारक समिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय परिसरात लोक सहभागातून उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक, अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची कल्पना व विचार समजून घेण्यासाठी आणि त्यावरील संशोधन अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्मारक समिती साधने उपलब्ध करून देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे भारतासह जगामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावरील पडलेल्या प्रभावाचे संशोधन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समाजातील उपेक्षित पीडित मागासवर्गीय व समाजातील दुर्बल घटकांच्या जैविक पैलू बद्दल संशोधन व अभ्यास करण्यासाठी संशोधकांना शिष्यवृत्ती व संशोधन साधनांची पूर्तता करण्यासाठी या स्मारकाचे निर्माण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रवर्ती ठेवून त्यांच्या कारकीर्दीच्या आधी व तद्नंतर ज्या- ज्या महापुरुषांनी संतांनी लोकनेत्यांनी कार्य केले आहे. त्याबद्दल सुद्धा संशोधन व्याख्यान परिसंवाद इत्यादी आयोजित करून त्यावर आधारित पुस्तके प्रकाशित करण्याचे कार्य स्मारक समिती करणार आहे.यावेळी प्र- कुलगुरू डाॅ. संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ. मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश डुके, सहसचिव तथा अधिष्ठाता डाॅ. प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शिंदे, प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे व इतर उपस्थित होते.

असा असेल पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट असून उंची ९ फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून त्यावरील छत्र ७ फुट आहे. ब्रांन्झ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन १०,००० किलोग्राम असेल. हा पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT