ऑनलाईन पुढारी डेस्क : कृत्रिम मांसाचे बर्गर बनवण्याचा प्रयोग जिवंत प्राण्यांच्या पेशी वापरून केला होता. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले चिकन खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दिल्याने लवकरच असे कृत्रिम मांस बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील काही वर्षांपासून कृत्रिम मांस तयार करण्याबाबत जगभर संशोधन सुरू आहे. काही कंपन्यांना त्यात यशही आले आहे. 'इट जस्ट' या कंपनीने अशाच प्रकारचे मांस तयार केले आहे. त्याला सिंगापुरात मान्यताही मिळाली आहे. पण अमेरिकेच्या अन्न औषध प्रशासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. या शिवाय जगभरात अनेक स्टार्टअप कंपन्या याच विषयावर काम करीत आहेत. २०१६ मध्ये इस्रायलच्या फ्युचर मीट आणि इम्पॉसिबल फूड या दोन कंपन्यांनी आता अमेरिकेतील अपसाईड फूडस् कंपनीने प्रयोगशाळेत चिकन तयार केले आहे. जिवंत प्राण्याच्या पेशींचा वापर करून त्यांच्या मदतीने कृत्रिम मांस तयार करण्यात यश आले. अन्न औषध प्रशासनाने कठोर पडताळणीनंतर हे चिकन खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असले तरी हे चिकन तत्काळ बाजारात येणार नाही. आणखी काही चाचण्या आणि काही विभागांची परवानगी मिळवावी लागणार आहे. त्यानंतरच हे चिकन बाजारात येईल.
अपसाइड फूडस् चे व्यवस्थापकीय संचालक उमा वलेटी यांनी अन्न औषध प्रशासनाचा हिरवा कंदील मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आता सर्वांच्या टेबलवर हे अन्न येण्याचा दिवस जवळ आला आहे, असे म्हटले आहे.