पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हजरजबाबीमुळे एका कॅमेऱ्यामनचे प्राण वाचले आहेत. एका कार्यक्रमात कॅमेरामनला भोवळ आली असता, आपले सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत मंत्री कराड यांनी कॅमेरामनच्या मदतीला देवदूतासारखी धाव घेतली. केंद्रीय मंत्री हे पेशाने डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गाभीर्य समजून घेत या कॅमेरामनचे प्राण वाचवले.
केंद्रीय मंत्री भागवत कराड हे दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखत देत होते. ही चर्चा कव्हर करण्यासाठी आलेला एक कॅमेरामन मुलाखतीदरम्यानच बेशुद्ध पडला. हे पाहून केंद्रीय अर्थराज्यमंत्री हे डॉक्टर कराड असल्याने तातडीने या कॅमेरामनच्या मदतीसाठी पोहोचत त्यांनी त्याची नाडी तपासली. यानंतर त्याने पल्स रेट वाढवण्यासाठी कॅमेरामनचे हात आणि पायाचे पंजे दाबण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटातच कॅमेरामन शुद्धीवर आला. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी त्याच्या शरीरीतील ग्लुकोजची पातळी वाढण्यासाठी मिठाई खाऊ घातली. त्यानंतर या कॅमेऱ्यामनाची प्रकृती सुधारली.
केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत भागवत कराड यांचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " यापूर्वी राजशिष्टाचार बाजूला ठेवून डॉ. भागवत कराडजींनी एका विमानप्रवाशाचे प्राण वाचवले होते. आता त्यांची मुलाखत सुरू असताना चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामनलाही त्यांनी तातडीने उपचार देत जणू देवदूताची भूमिका बजावली. डॉक्टर, आपल्या कर्तव्यनिष्ठेला सलाम. अभिमान वाटतो, आपण सहकारी आहोत!" योगगुरू स्वामी रामदेव यांनीही डॉ.कराड यांच्या कार्याचे कौतुक केले.