Latest

नगरमध्ये दारूचा महापूर ! आठ महिन्यांत 41 हजार लिटर दारू जप्त

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  बनावट आणि अवैध दारू विक्रीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या नगर जिल्ह्यात आठ महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल, ढाबे यासह अन्य ठिकाणच्या 1621 पेक्षा अधिक अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त घेतला. दरम्यान, या कारवाईत 1561 आरोपींना अटक केलेली असून, त्यांच्याकडून 84 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर अजूनही राज्य उत्पादन विभागाला पूर्णपणे आळा घालण्यात यश आलेले नाही. असे असले तरी गेल्या आठ महिन्यांत या विभागातून कारवाईचे सत्र सुरूच आहे.

1 एप्रिल ते डिसेंबर 2023 पर्यंत अवैध दारू, यात बनावट मद्यविक्री, निर्मिती व वाहतूक विरोधात वेळोवेळी कडक कारवाई करण्यात आलेली आहे. यात अवैध हॉटेल व ढाबे यांच्यावर छापे टाकून 488 केसेस केल्या आहेत. यात 539 आरोपींना अटक केलेली आहे. तर 7 वाहने जप्त केली आहेत. हातभट्टी दारू निर्मिती व विक्री वाहतुकीवरील कारवाईत 727 छापे टाकले असून यातून 615 आरोपींना अटक केली तर 46 वाहने जप्त केलेली आहेत. याशिवाय ताडीविक्री व निर्मितीवरही 55 ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत 55 आरोपींना बेड्या ठोकल्या. अशाप्रकारे आठ महिन्यांत जिल्ह्यात सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. कारवाईतील हातभट्टी, ताडी, आणि रसायन हे नष्ट करण्यात आलेले आहे. तर बीअर, देशी, विदेशी दारू हे कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात येते, अशी माहिती समजली.

थर्टी फस्टवर सात पथकांची नजर
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध दारूविक्रीवर कारवाईसाठी अधीक्षक सोनोने यांनी सात पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात एक पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक आणि सात पोलिस कॉन्स्टेबल असे 11 जण असणार आहेत. नुकतीच एक बैठक घेऊन त्यांना सोनोने यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे समजले.

अवैध दारूसंदर्भात आपले कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी तसेच हॉटेल व्यवसायिकांनीही कुठेही कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
                                                – प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

बीअर ः 427 लिटर
देशी दारू ः 5604 लिटर
विदेशी दारू ः 1419 लिटर
परराज्यातील मद्यः 855 लिटर
हातभट्टी दारू ः 24,687 लिटर
ताडी ः 4309 लिटर
रसायन ः 3320 लिटर
काळा गुळ ः 441 किलो

SCROLL FOR NEXT