Latest

पर्यटकांच्या सुरक्षेला रत्नागिरीतील गावांचे प्राधान्य!

दिनेश चोरगे

रत्नागिरी : जिल्ह्यातील सागरी पर्यटनामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असली तरी शासनाकडून पर्यटकांची सुरक्षा वार्‍यावरच सोडलेली दिसत आहे. अनेक किनार्‍यांवर सुरक्षारक्षकांची वानवा दिसत असली तरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या धार्मिक पर्यटनस्थळी मात्र सुरक्षारक्षक व वॉटर स्पोर्टस्मुळे अपघात टाळले जात आहेत. किनारा धोकादायक असला तरी बचावपथकांमुळे तो सुरक्षित करण्यात स्थानिक यंत्रणांना यश आले आहे. जिल्ह्यात दापोली, गुहागरमध्येही काही ग्रामपंचायतींनी सुरक्षा रक्षक नेमत पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

गोवा, सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. या किनार्‍यांवर येणार्‍या पर्यटकांची संख्याही गेल्या दोन-तीन वर्षांत वाढली आहे. रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे हे प्रसिद्ध किनारे मात्र सुरक्षा रक्षकांविना आहेत. समुद्रकिनार्‍यालगतच्या काही वर्षांपूर्वी भाट्ये समुद्रकिनारी एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. आरेवारे याठिकाणीही एकाचवेळी तीन-चारजणांचा बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही ठिकाणी खाडीचा भाग समुद्राला येऊन मिळत असल्याने, येथील किनारा धोकादायक ठरतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यांमधील अनेक समुद्र किनारे हे प्रसिद्ध असून, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती भागातून येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. समुद्राच्या लाटा व पाण्याच्या करंटचा अंदाज न आल्याने बुडणारे अधिक असतात, असेही निरीक्षण नोंदवले गेले आहे. भरती-ओहोटीच्यावेळी या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जाणकारांकडून माहिती घेऊन पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरायला हवे.

गणपतीपुळे असा बनला सुरक्षित…

धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेचे नाव जागतिक पर्यटनस्थळ म्हणून घेतले जात आहे. गणपतीपुळेतील समुद्र मात्र धोकादायक आहे. शासनाकडून सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे? गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान यांनी विशेष प्रयत्न करून सुरक्षा रक्षक ठेवण्यास सुरुवात केली. या सुरक्षा रक्षकांना स्थानिक विक्रेत्यांचीही साथ मिळाल्याने समुद्रातील अपघात टाळता येऊ लागले. यातच मागील तीन-चार वर्षांत वॉटर स्पोर्टस्ला चालना मिळाल्यामुळे येथील कर्मचारीही मदतीला धावू लागले.

वॉटर स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटीमुळे अपघातांचे प्रमाण घटले

जिल्ह्यातील अनेक किनार्‍यांवर वॉटर स्पोर्टस् सुरू झाले आहेत. यामुळे येथील व्यावसायिक जागरूक असतात. दुर्घटना घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न होतात. त्यामुळेही अपघातांच्या संख्येत घट झाली आहे.

SCROLL FOR NEXT