वॉशिंग्टन : जगभरातील वाढते तापमान हे सातत्याने त्रासदायक ठरत चालले असून, पुढील काही वर्षांत पृथ्वीचे तापमान जवळपास 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, असा शास्त्रज्ञांचा होरा आहे. तापमानवाढीचा वेग असाच कायम राहिला, तर यामुळे जगात काही भागांमध्ये कोरडा दुष्काळ पडू शकतो, तर लाखो लोकांना जीव गमवावा लागू शकतो. यामुळे पृथ्वीची तापमानवाढ कशी कमी करता येईल, यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून वातावरणात बर्फवृष्टीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी दर आठवड्याला 2 टन बर्फ लागेल, असे चित्र आहे.
पाण्याचे बाष्प हा नैसर्गिक हरितगृह वायू आहे. तो उष्णतेला रोखून धरतो. कोळसा, तेल किंवा गॅस जळल्यावर निघणारा कार्बन डायऑक्साईड जसे काम करतो, तेच काम हे बाष्प करते. त्यामुळेच कार्बन डायऑक्साईडइतकेच ते धोकादायकही आहे. म्हणूनच पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात असलेले बाष्प जर नाहीसे केले, तर उष्णतेला बाहेर जाण्याची वाट मिळेल. यामुळे पृथ्वीचे तापमान कमी होईल, म्हणजेच पृथ्वी थोडी थंड होईल, अशी ही रचना आहे.
नॅशनल एशियानिक अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या शास्त्रज्ञांनी वातावरणाच्या वरच्या भागात असलेल्या बाष्पकणांना सुकविण्याची ही योजना तयार केली आहे. वातावरणाच्या त्या भागात बर्फ टाकण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे, असे 'सायन्स अॅडव्हान्सेस' ने एका शोधनिबंधात म्हटले आहे.
या संशोधनानुसार अत्याधुनिक विमानाद्वारे पृथ्वीपासून 17 किलोमीटर उंचीवरून हवेत बर्फाचे कण फेकले जातील. बर्फामुळे बाष्पकण थंड होतील. यासाठी दर आठवड्याला दोन टन बर्फ हवेत टाकावा लागेल. तसे केल्याने तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते. तापमान फार कमीदेखील होणार नाही आणि हवेतील प्रदूषणही कमी होईल. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याआधी त्यावर आणखी संशोधन व्हावे लागेल, असे सध्याचे संकेत आहेत.