Latest

शिधापत्रिका होणार लवकरच ऑनलाईन

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाकडून गोरगरीब जनतेला स्वस्त दरात दरमहा धान्य उपलब्ध केले जात आहे. त्यासाठी घरटी एक शिधापत्रिका दिली जात आहे. कित्येक वर्षांपासून वापरात असलेल्या शिधापत्रिका जुन्या आणि जीर्ण होत आहेत. अशा शिधापत्रिका गोरगरीब जनतेला सांभाळणे कठीण होत आहे. सध्या तंत्रज्ञानाने भरारी घेतली. या तंत्रज्ञानाचा उपयोग ई-शिधापत्रिका तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील आठ ते दहा लाख रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका उपलब्ध होणार आहेत.
देश स्वतंत्र झाल्यापासूनच राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात धान्य वाटप केले जात आहे. धान्य घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक शिधापत्रिका दिली जात आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा उल्लेख असतो. सदस्यसंख्येवरून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. सध्या पिवळी, केशरी आणि पांढर्‍या रंगाच्या शिधापत्रिका वाटप केल्या आहेत. एके काळी नागरिकांची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर केला जात होता. गोरगरीब जनतेसाठी शिधापत्रिका एक मौल्यवान दस्तावेज आहे.

आजमितीस सगळीकडे संगणक, लॅपटॉप युग अवतरले आहे. शिधापत्रिकाधारकांच्या नावे आता संगणकीकृत करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पॉज मशीनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. त्यामुळे धान्याचा काळाबाजार थांबून गरजूंना धान्य उपलब्ध होत आहे.
या तंत्रज्ञानाचा उपयोग आता ई-शिधापत्रिकेसाठी केला जाणार आहे. शासनाने प्रत्येक शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच प्रत्येक नागरिकांची शिधापत्रिका ऑनलाईन होणार आहे.

जिल्ह्यात आजमितीस 30 ते 35 लाख जनतेला स्वस्त धान्य उपलब्ध होते. त्यामुळे जवळपास 8 ते 10 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिका टप्प्याटप्प्याने ई-शिधापत्रिका होणार आहेत. त्यासाठी सेतू, महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार या केंद्रचालकांना पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे. लवकरच अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन अर्जदारांना पब्लिक लॉगिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरी बसून मोबाईल व संगणकाद्वारे ई- शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT