सिंधुदुर्ग : आर्थिक महासत्ता बनण्याचे टार्गेट समोर असताना महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न राज्यात वरच्या क्रमांकावर असले तरी राज्याच्या उत्पनिनात मात्र केवळ 0.76 टक्का हिस्सा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्पन्नाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 2 लाख 55 हजार इतके असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अर्थात, जिल्ह्याच्या उत्पन्नात सर्वात जास्त वाटा कृषी क्षेत्राचा असून, कमी वाटा मच्छीमार व्यवसायाचा झाला आहे.
सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 29 लाख कोटी इतकी आहे. ती 1 ट्रिलियन डॉलर होण्यासाठी 81 लाख कोटींपर्यंत जाणे आवश्यक आहे. राज्य सरकारने ही अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे उत्पन्न वाढविण्याचे
नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या मोठ्या शहरानंतर दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर लागत असला तरीदेखील एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न 23 हजार 500 कोटी इतके आहे. लोकसंख्या केवळ 8 लाख इतकी असल्यामुळे दरडोई उत्पन्न 2 कोटी 55 लाखांपर्यंत दिसते. बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण उत्पन्न 39 हजार कोटींचे असून तेथील लोकसंख्या जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्नात तो जिल्हा सिंधुदुर्गच्या मागे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न वाढावे यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शनाची जबाबदारी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाकडे सोपविली आहे. शिवाजी विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. तळुले यांनी अलिकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा करून हे उत्पन्न कसे वाढविता येईल, या दृष्टिकोनातून शेतकरी, बागायतदार, व्यापारी, व्यवसायिक व मच्छिमारांच्या बैठका घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्याची तयारी युध्दपातळीवर सुरू आहे. त्यातून जिल्ह्याचा राज्याच्या उत्पन्नात खूपच कमी वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, 2022-23 या आर्थिक वर्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण उत्पन्न आणि त्याचे स्वरूप संबंधित सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. एकूण 23 हजार 500 कोटी रू. उत्पन्नापैकी 4 हजार 252 कोटी रु. म्हणजेच 20.56 टक्के इतके उत्पन्न कृषी आणि फलोद्यानमधून प्राप्त झाले आहे. वनविभाग व संबंधित क्षेत्रातून 3 हजार 700 कोटी म्हणजेच 18.31 टक्के आणि री इस्टेट व प्रोफेशनल सर्व्हिसेस मधून 3 हजार 223 कोटी रू. म्हणजेच 15.58 टक्के इतके उत्पन्न मिळाले आहे.
अलिकडच्या काळात उत्पादनातून उत्पन्नाचे प्रमाण वाढले आहे. उत्पादनामधून 2 हजार 288 कोटी म्हणजेच 10.91 टक्के इतके उत्पन्न मिळाले आहे. बँका व तत्सम सेवेतून 1 हजार 418 कोटी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधून 1 हजार 328 कोटी, तर बांधकाम व्यवसायातून 892 कोटी रू. उत्पन्न नोंद झाली आहे. मायनिंगमधूनही 305 कोटी तर रेल्वे वगळता ट्रान्सपोर्टमधून 327 कोटी इ. उत्पन्न नोंदले गेले आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून 75 कोटी तर गोदामातून 28 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 कि.मी.ची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे मासे व भात हे प्रमुख अन्न आहे. आता तर सिंधुदुर्गतून इतर भागाकडे माशांची निर्यात होते. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उत्पन्नामध्ये मासेमारीतून केवळ 125 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मासेमारी व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नाचा हिस्सा केवळ 0.60 टक्के इतकाच आहे. मात्र, शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातून मत्स्यव्यवसायातून वर्षाकाठी 1100 कोटी रू. चे उत्पन्न त्या जिल्ह्याला मिळते. जिल्ह्यामध्ये मस्त्यव्यवसायाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठा वाव असून शासनाने आणखी खूप मोठे प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.