Latest

सांगली : नशेच्या गोळ्या, गांजा खुलेआम

दिनेश चोरगे

सांगली; स्वप्निल पाटील : खून, दरोडे, अपहरण, बलात्कार इत्यादी प्रकारांसाठी बिहार प्रसिद्ध होते. पूर्वी फक्त हे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना ऐकावयास मिळत होते. परंतु आता ते पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात पिस्तूल, हत्यारे, नशेच्या गोळ्या, गांजा, सर्रास मिळत आहेत. याला अटकाव आणण्यासाठी पोलिसांना यश आलेेले नाही. पोलिस, अन्न व औषध प्रशासन कोमात असल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारीने गाठली परिसीमा

जिल्ह्यातील गुन्हेगारीने परिसीमा गाठली आहे. पूर्वी पूर्ववैमनस्यातून हाणामारीच्या घटना, जास्तीत जास्त गंभीर स्वरुपाचे हल्ले अशा घटना होत होत्या. परंतु या गुन्ह्याचे स्वरुप मात्र बदलले आहे. किरकोळ कारणातून हाणामारी नाहीतर थेट 'मुडदे' पाडण्यात येत आहेत.

नशेतून भडक माथ्याचे गुन्हेगार

मिसरूड देखील न फुटलेले अनेक गुन्हेगार सध्या जिल्ह्यात 'डॉन' बनण्याच्या वाटेवर असल्याचे दिसून येते. एखाद्या गुन्ह्यात तडीपार अथवा शिक्षा भोगत असणार्‍या गुन्हेगाराला 'गॉडफादर' मानून नवे गुन्हेगार त्यांना 'फॉलो' करत असल्याचे दिसून येते. डॉन बनण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगार आता सुपार्‍या घेऊन खुनाच्या घटनांना 'अंजाम' देत असल्याचे दिसून येते.

परराज्यातील टोळ्यांचे 'पडसाद'

बिहार, राजस्थान इत्यादी राज्यातील अनेक गुन्हेगार देशभरात प्रसिद्ध आहेत. अशा टोळ्यांचे सोशल अकाउंट देखील असते. आणि त्यांना फॉलो करणाने अनेक नवोदित गुन्हेगार देखील आहेत. त्यांना फॉलो करणार्‍या गुन्हेगारांमध्ये त्या टोळ्यांचा उल्लेख देखील दिसून येते. या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवायांचे पडसाद जिल्ह्यात देखील दिसून येत आहेत.

खुनाची पद्धत बदलली

पूर्वी खुनासाठी तलवार, कोयता इत्यादी धारदार हत्यारांचा वापर करण्यात येत होता. आता काही हजारामध्ये आणि सर्रास मिळणार्‍या विदेशी व देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करण्यात येत आहे. थेट गोळ्या घालून 'मुडदे' पाडण्यात येत आहेत.

पिस्तूल तस्करीचे आंतरराज्य 'रॅकेट'

जिल्ह्यात विदेशी आणि देशी बनावटीचे पिस्तूल विकणार्‍यांची टोळी निर्माण झाली आहे. पन्नास हजारापासून लाख, दीड लाखापर्यंत पिस्तुलांची विक्री करण्यात येत आहे. बहुतांश पिस्तूल हे बिहारमधून सांगली जिल्ह्यात येत असल्याची माहिती मिळते. काही प्रमाणात कारवाया करून पिस्तूल विक्रेत्यांना पकडण्यात येते.

अल्पवयीन तरुणांचा वापर

गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगारांकडून गुन्हेगार बनण्याची खुमखुमी असणार्‍या तरुणांनाच हेरून त्यांना गुन्हेगारीचे धडे देण्यात येत आहेत. आणि त्यांच्याकडून एखादा मोठा 'कांड' घडवून आणला जात असल्याचे देखील दिसून येते.

नशेखोर ते गुन्हेगार

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नशेच्या गोळ्या, गांजा उपलब्ध होत आहे. याला अटकाव आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला होता. परंतु तो सपशेल अपयशी झाला आहे. परंतु नशेच्या गोळ्यांवर कारवाई करण्यासाठी मात्र अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

हीच गुन्हेगारी मोडित निघाली का?

गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी क्राईम मिटींग घेतली. पालकमंत्र्यांनी या बैठकीत गुन्हेगारी मोडित काढण्याचे आदेश दिले आणि तिसर्‍याच दिवशी सांगलीत गोळ्या घालून खुनाचा प्रकार घडला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

गुन्हेगारांना राजकीय पाठबळ

जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असल्याचे दिसून येते. एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी पोलिस सरसावल्यास त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरू केली होती. परंतु त्या गुन्हेगारांवरील तो आदेश रद्द करण्यास राजकीय नेत्यांकडून पोलिसांना भाग पाडले जाते. त्यामुळे केवळ राजकीय पाठबळावर तेच गुन्हेगार पोलिसांसमोरच ताठ मानेने फिरत असल्याचे देखील चित्र दिसून येते. अशा स्थितीत गुन्हेगारांना अधिकच बळ मिळू लागले असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT