Latest

रांजणीत आढळून आलेला बिबट बछडा अखेर पोहोचला आईच्या कुशीत !

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा: रांजणी (ता.आंबेगाव ) येथील धुमाळवस्तीत भरत हारकू वाघ यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना आढळून आलेला बिबट बछडा शनिवारी (दि. १८ ) सायंकाळी पावणे सात वाजता सुखरूप मादीच्या कुशीत विसावला. ही घटना ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाली आहे. रांजणी येथील धुमाळवस्तीत भरत वाघ यांच्या शेतात शनिवारी (दि .१८ ) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तीन बिबट बछडे आढळून आले होते. त्यापैकी दोन मृतावस्थेत होते. तर एक बछडा जिवंत होता. दोन बछड्यांचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले होते. जिवंत असलेल्या बछड्याला सुखरूप मादीच्या कुशीत सोडण्याचे आव्हान वनविभागासमोर होते.

वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगवे येथिल निसर्ग व वन्यजीव अभ्यासक शारदा दत्तात्रय राजगुरू यांनी शनिवारी ( दि .१८) सायंकाळी भरत वाघ यांच्या शेतात  ट्रॅप कॅमेरा लावला. तेथे क्रेटमध्ये बछड्याला ठेवले . सहा वाजून ४५ मिनिटांनी तेथे बिबट मादी येऊन बछड्याला अलगदपणे घेऊन गेली. हे दृश्य ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाले आहे. यावेळी निसर्ग अभ्यासक दत्तात्रेय राजगुरू , वनसेवक महेश टेमगिरे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT