Latest

..अन कुणीच हात वर केला नाही ! ग्रामसभेत दारुबंदीच्या मुद्याला सर्वांचीच बगल

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  गावात दारूबंदी झाली पाहिजे, दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.दारूबंदी झाली तर गावचा विकास होईल, अशी भूमिका एक तरुण पोटतिडकीने गावच्या ग्रामसभेत मांडतो. गावात दारूबंदी झाली पाहिजे, असे किती जणांना वाटते? त्यांनी हात उंचावून दाखवा, असे आवाहन तो तरुण करतो. मात्र, एकाचेही हात उंचावून समर्थन दर्शविण्याचे धाडस झाले नाही. हे विशेष.
तालुक्यातील एका गावात ग्रामसभेत घडलेल्या या दारूबंदी मुद्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ग्रामसभेला गावच्या विकासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभेत प्रत्येक नागरिक सहभागी होऊन प्रश्न मांडतो. ग्रामसभेपुढे आलेले प्रश्न तातडीने मार्गी लागले जातात. गावातील वेगवेगळ्या भागांतील प्रश्न ग्रामसभेपुढे आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होते. गेल्या काही वर्षांत ग्रामसभेत उपस्थित राहणार्‍या नागरिकांची टक्केवारीही चांगलीच वाढली आहे.

प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर गावोगाव ग्रामसभा झाल्या. तालुक्याच्या एका गावात ग्रामसभा सुरू झाल्यानंतर एक तरुण दारूविक्रीमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत भूमिका मांडतो. त्याने उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून गावात दारूबंदी व्हावी, असे किती जणांना वाटते? ज्यांना दारूबंदी व्हावी, असे वाटते त्यांनी हात उंचावून समर्थन दर्शवा. मात्र, कुणीही समर्थन दर्शवले नाही. उलट काही मंडळींनी या मुद्याची खिल्ली उडवत दारूबंदीच्या विषयाला बगल दिली. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून दारुबंदीसाठी प्रयत्नशील आहे. व्यसनाधीन तरुणाना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, तो दारुबंदीबाबत मांडत असलेली भूमिका कुणी मान्य करायला तयार नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

SCROLL FOR NEXT