सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी वरचे वर थांबवले जाते. यातून गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी दाखल केली आहे. त्यावर उद्या (दि. 12) चर्चा होण्याची शक्यता असून, हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.
पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे. त्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पिके जगवण्यासाठी शेतकर्यांतून पाण्याची मागणी वाढलेली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी वेळोवेळी थांबविण्यात आले. सांगली पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची मागणी करूनही सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे वेळेवर पाणी सोडले गेले नाही. त्यांच्याकडून अडवणूक होते, असे आरोप झाले. यातून राजकीय नेत्यांत जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. पाणी सोडण्याबाबतचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला. त्यानंतर कालवा समितीची बैठक घेऊन सांगलीच्या वाट्याचे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. तरीसुद्धा पालकमंत्री देसाई यांच्या भूमिकेमुळे पाणी मागणी करूनही सोडले नाही.
त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतर काही दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले. त्यावर खासदार संजय पाटील यांनी पालकमंत्री देसाई व आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका करून, प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
नोव्हेंबर महिन्याचे सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे दीड टीएमसी पाणी अद्याप शिल्लक आहे. त्याशिवाय डिसेंबर महिन्याचे पाणीही अजून बाकी आहे. तरीसुद्धा कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी 7 डिसेंबरपासून थांबवण्यात येणार असल्याचे पत्र सांगली पाटबंधारे विभागाला दिले होते. मात्र अद्याप तरी विसर्ग सुरू आहे. अधिवेशनाचा धसका घेऊन हा विसर्ग सुरू असल्याची चर्चा आहे.