Latest

तिसऱ्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारात आलाय अदानी, अंबानींचा मुद्दा

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराचा मुद्दा बदलत चालला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारात काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप, दुसऱ्या टप्प्यात संपत्ती वारसा कर व मंगळसूत्र तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात आरक्षण आणि अल्पसंख्यांकाचा मुद्दा जोरात होता. आता चौथ्या टप्प्यातील प्रचारात उद्योगपती अदानी, अंबानी चर्चेत आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या करीमनगर येथील प्रचार सभेत पहिल्यांदाच उद्योगपती अदानी, अंबानी यांचे नाव घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहूल गांधी गेल्या ५ वर्षांपासून दिवस-रात्र ५ उद्योगपती, अदानी व अंबानी टीका करत होते. मात्र, आता लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राहुल गांधी यांनी एकदाही अदानी, अंबानी यांना शिव्या घातल्या नाहीत. त्याचे कारण काय? अशी तोफ पंतप्रधान मोदी यांनी डागली.

राहुल गांधी यांनी गप्प बसण्यासाठी अदानी, अंबानी यांच्याकडून किती रक्कम घेतली? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. राहुल गांधी यांना पोते भरून काळा पैसा मिळाला का?, काँग्रेसला निवडणुकीसाठी उद्योगपतींकडून टेम्पो भरून पैसे पोहोचलेत का? असे सवाल करून पंतप्रधानांनी काँग्रेसला डिवचले. पंतप्रधानांच्या या हल्ल्यावर काँग्रेसने बचाव करण्याऐवजी सावध पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांनी स्वतःहून अदानी, अंबानी यांचा विषय काढल्यामुळे काँग्रेसला आनंदाचे भरते आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांच्या झंझावाताला कसे सामोरे जायचे, हा काँग्रेसपुढे मोठा प्रश्न होता. मात्र, आता चौथ्या टप्प्याचे मतदान होत असताना काँग्रेसला विजयाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी अदानी अंबानी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात आनंद पसरला आहे. आधी निराशेच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसला आता ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होत असल्याचा विश्वास वाटू लागला आहे.

भाजपच्या "अब की बार ४०० पार" या घोषणेमुळे डळमळीत झालेल्या काँग्रेसच्या एका नेत्याने तर आमचा पक्ष फक्त ७० जागा जिंकू शकेल, असे म्हटले होते. मात्र, आता मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात विश्वास वाढून काँग्रेस सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसू लागले आहे.

अदानी,अंबानी यांच्यावरील विधानानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना चिमटा काढला आहे. बघा, वेळ कशी बदलली आहे. 'दोस्त दोस्त ना राहा' अशी पंतप्रधानांची स्थिती झाली आहे. तीन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्याच मित्रांवर हल्ला चढवित आहेत, असा पलटवार खर्गे यांनी केला आहे. मोदी यांची खुर्ची डगमगू लागली आहे. निवडणूक निकालाचा हाच कल असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे पंतप्रधानांनी लावलेल्या आरोपांवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी अदानी,अंबानी यांचा उल्लेख करण्याचे थांबविलेले नाही. ते दररोज प्रचारात अदानी, अंबानी यांच्याविषयीची सत्यता तुमच्यापुढे मांडत आहेत, असे प्रियांका गांधी वधेरा यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मोठमोठ्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, परंतु शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नसल्याचे सत्य राहुल गांधी यांनीच मांडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर उत्तर द्यावे, असेही प्रियांका गांधी वधेरा यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT