Latest

मसाल्याच्या मिरचीचा वाढला ठसका! काश्मिरी, संकेश्वरीचे दर ४० टक्क्यांनी वधारले

मोहन कारंडे

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणींची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यात प्राधान्याने वर्षभर पुरेल इतका लाल मसाला तयार करण्यासाठी लगबग आहे. त्यामुळे बाजारात आता मसाल्याच्या मिरच्यांची मागणी वाढली आहे. मात्र यावर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्या कमी प्रमाणात दिसत आहेत. परंतु दुसरीकडे या मिरच्यांची मागणी वाढल्याने, त्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यातही मसाल्याचा रंग खुलवणारी काश्मिरी मिरची आणि मसाल्याची चव वाढवणारी संकेश्वरी मिरची तर बाजारात अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी बाजारातील मिरच्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत. त्यामुळे यावर्षी साठवणुकीचा मसाला करताना महिलांना आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात उन्हे तापू लागली की, वाशीतील घाऊक मसाला बाजारात मिरची आणि मसाल्याच्या पदार्थांची आवक वाढू लागते. एकेकाळी या हंगामात बाजारात मिरच्यांच्या ८० ते १०० गाड्यांची आवक दिवसाला होत होती. मात्र हळूहळू परिस्थिती बदलली. ऑनलाईनच्या जमान्यात ही आवक कमी कमी होत गेली. थेट पणनाचा कायदा आल्यानंतर बाजार खुले झाल्याने तर ही आवक दिवसाला अवघ्या ३० ते ४० गाड्यांवर आली. त्यातच यावर्षी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे उत्पादन कमी असल्याने, बाजारात मिरची कमी प्रमाणात येत आहे.

सध्या घाऊक बाजारात दिवसाला अवघ्या ८ ते १० गाड्या मिरची बाजारात येत असल्याची माहिती मिरचीचे बाजारातील घाऊक व्यापारी अमरीश बारोट यांनी दिली आहे. संपूर्ण हंगामात बाजारात मसाल्याच्या सात ते आठ लाख पोती मिरच्या बाजारात येतात. एका पोत्यात ४० ते ५० किलो मिरची असते. मसाल्यासाठी मुख्यतः बेडगी, तेजा, संकेश्वरी, काश्मिरी या मिरच्या लागतात. त्यांच्याबरोबर अख्खा गरम मसालाही लागतो. या अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत. मात्र मसाल्यात मुख्य घटक मिरची हाच असतो. तीच महागल्याने मसाला कसा बनवणार हा प्रश्न आहे, तर मिरचीची आवक महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणात होते.

रेशमपट्टी या कमी तिखट मिरचीला गुजराती वर्गाकडून मागणी असते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने, बाजारातच कमी प्रमाणात मिरच्या उपलब्ध आहेत. परिणामी सर्वच जातीच्या मिरच्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT