Latest

‘हॉर्न’ जितका जास्त, तितका सिग्नल जास्त! मुंबई वाहतूक पोलिसांची नामी शक्कल

मोहन कारंडे

मुंबई : सुरेखा चोपडे : वाहतुकीची कोंडी, त्यातच कारण नसताना कर्णकर्कश 'हॉर्न' वाजविणाऱ्या मुजोर वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी आणि वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. सिग्नलवर जितका जास्त 'हॉर्न' वाजेल तेवढा सिग्रलचा कालावधी वाढवून अशा चालकांना धडा शिकवला जाणार आहे.

घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना वाहतुकीच्या कोडींसोबतच थोड्या-थोड्या अंतरावर सिग्नल लागतो. त्यामुळे वाहन चालकांची सहनशक्ती संपते नि मग दुचाकी, चारचाकी, बस आणि अवजड वाहनांचे चालक हॉर्न वाजवतात. कधी एकदा सिग्रल सुटतो अशी चढाओढच जणू चालकांमध्ये हॉर्नच्या माध्यमातून सुरू असते. त्यामुळे एकाचवेळी हॉर्नवर हॉर्न वाजतात. रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी आणि जवळच्या रहिवाशांवर त्यामुळे कानावर हात ठेवण्याची वेळ येते. अनेकदा हॉर्नचा आवाज जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले घाबरतात. त्यामुळे हॉर्नचा होणारा त्रास लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी एक प्रस्ताव तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार जितका मोठा हॉर्न वाजवाल, तितका मोठा फटका वाहन चालकांना बसणार आहे. वाहतूक पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाची एक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार हॉर्नच्या आवाजाने ही मर्यादा ओलांडली की सिग्रल संपताचक्षणी पुन्हा सिग्नलचा वेळ अंदाजे ९० सेकंदासाठी वाढेल. यामुळे सतत हॉर्न देणाऱ्या चालकांना पुन्हा सिग्नलवर थांबावे लागणार आहे. हॉर्नचा आवाज कमी झाला नाही, तर सिग्रल तसाच सुरू राहील. जेव्हा हॉर्नचा आवाज कमी होईल तेव्हाच सिग्नल सुटेल आणि वाहनचालकांना पुढे जाता येईल.

हॉर्नच्या डेसिबलची नोंद घेऊन कार्यान्वित होणारी सिग्नल यंत्रणा मुंबईत बसवण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होण्याचा प्रयत्न आहे.
– प्रवीण पडवळ, सहपोलीस आयुक्त (वाहतूक)

SCROLL FOR NEXT