Latest

Baramati Lok Sabha Election : बारामतीतील हायप्रोफाईल लढतीकडे सार्‍या देशाचे लक्ष

Arun Patil

लोकसभा निवडणुकीतील तिसरा टप्पा रंगतदार ठरणार आहे. त्यासाठी सात मे रोजी मतदान होणार असून सार्‍या देशाचे लक्ष बारामतीतील नणंद (सुप्रिया सुळे) विरुद्ध भावजयी (सुनेत्रा पवार) यांच्यातील लढतीने वेधून घेतले आहे. याखेरीज या टप्प्यात कोल्हापूर व सातारा यासारख्या मतदारसंघांतही लक्षवेधी सामने रंगणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी जबरदस्त आव्हान दिले आहे. सुनेत्रा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरी त्यांच्या प्रचारात कुठेही हे नवखेपण जाणवत नाही. शिवाय अजित पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघावर मजबूत पकड आहे. दुसरीकडे, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेक सुप्रिया यांच्या प्रचार मोहिमेत मातोश्री प्रतिभा पवार याही सामील झाल्या आहेत.

कोल्हापुरातील दुरंगी लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. उभय बाजूला तगड्या नेत्यांची फौज, कार्यकर्त्यांची मोठी कुमक, भक्कम रसद असल्याने दिवसेंदिवस निवडणुकीचे रंग गहिरे बनत चालले आहेत. काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मैदानात उतरविले आहे. सातार्‍यातील सामनाही रंगतदार ठरेल, अशी शक्यता आहे. तेथे उदयनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांनी आव्हान दिले आहे. याखेरीज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भवितव्य पणाला लागले आहे. सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत; पण खरे आव्हान विशाल पाटील (अपक्ष) यांनी उभे केले आहे.

गुजरातेत भाजपचा बोलबाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये यावेळी भाजप पुन्हा एकदा 26 जागा जिंकून क्लीन स्वीप करण्याची अपेक्षा बाळगून आहे. अमित शहा गांधीनगरमधून, तर केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून निवडणुकीला सामोरे जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यात निकराची लढत संभवते. त्या राज्यात नैसर्गिक आणि राजकीय तापमान वाढत चालले आहे. काँग्रेसने डाव्या पक्षांशी युती केल्यामुळे मतांच्या विभाजनाचा फायदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळू शकतो. यावरून तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. कर्नाटकमध्ये भाजपने 2019 मध्ये 28 पैकी 25 जागांवर बंपर विजय मिळवला होता. यावेळी पुन्हा एकदा तशाच कामगिरीसाठी भाजपने जोर लावला आहे. या राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा थेट लढती होत आहेत. मध्य प्रदेशात तिसर्‍या टप्प्यात शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह या तीन तारांकित उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

बिहारमध्ये पाच मतदार संघांत तिसर्‍या टप्प्यात मतदान होत असून तेथे एनडीए विरुद्ध इंडिया यांच्यात लढती होत आहेत. छत्तीसगडमध्येही सात मतदारसंघांत निवडणूक होत आहे. तेथेही असेच चित्र दिसून येते. आसाममध्ये तिसर्‍या टप्प्यात चार मतदारसंघांत मतदान होत आहे. तेथे भाजप आणि काँगे्रस हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आहेत.

SCROLL FOR NEXT