Latest

प्रियकराकडे पैसे मागणे हा गुन्हा नाही; हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण होऊ शकत नाही : हायकोर्ट

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : प्रियककराकडे पैसे मागणे हा गुन्हा म्हणता येणार नाही. ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण होणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने देताना आरोपी प्रेयसीला मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने प्रेयसीने दैनंदिन खर्च व किराणासाठी पैसे मागितले त्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोपीचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे. असे स्पष्ट करताना पोलिसांनी आरोपी प्रेयसी विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

नवघर येथील राजेंद्र आणि राखी (नावे बदलली आहेत) यांचे प्रेमसंबंध होते. एके दिवशी राजेंद्रने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राजेंद्रच्या भावाने राखी आपल्या भावाकडे सारखी पैशाची मागणी करत धमकावत असल्याचा आरोप करून दोन वर्षापूर्वी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राखी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केले.

हा गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका राखीने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी पोलिसांनी सुसाईड नोट आणि पीडिताने आपल्या सहकार्‍याला पाठविलेल्या व्हॉईस मेसेजच्या आधारे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती न्यायालयाला दिली. याला राखीच्या वतीने जोरदार आक्षेप घेेण्यात आला.

आमचे एकमेकांवर प्रेम होते. दैनंदिन खर्चासाठी आपण राजेंद्रकडे पैसे मागितले, मात्र त्याला पैशासाठी कधीही धमकावले नव्हते, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना पोलिसांनी गुन्हा दाखल करताना ज्या सुसाईड नोट व व्हॉईस मेसेजचा पुरावा म्हणून वापर केला आहे, त्यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा दावा केला.

आपण शेवटचा मेसेज घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वी केला होता. पैशांची मागणी आणि आत्महत्येचा काहीही संबंध नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची खंडपीठाने गंभीर दखल घेत राखीविरोधातील गुन्हा रद्द करत मोेठा दिलासा दिला.

SCROLL FOR NEXT