Latest

भिगवण : अग्निपंखाच्या कवायती ठरताहेत नेत्रदीपक

अमृता चौगुले

भरत मल्लाव

भिगवण : उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावत चालल्यान पाणवठे तयार होऊ लागताच देश-विदेशातील आकाशयात्री उजनीकडे मोठ्या प्रमाणात झेपावले आहेत. उजनीतील पाणवठे या आकाशयात्रींनी बहरून गेले आहेत. त्यातही रोहित अर्थात अग्निपंखाच्या कवायती तर नेत्रसुखद ठरू लागल्या आहेत. यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत उजनीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने उजनीत येणार्‍या विविध जातींच्या पक्ष्यांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, सोलापूरसह खालील भागात सतत पाणी सोडण्यात आल्याने पक्ष्यांची आवडीची ठिकाणे असलेले कुंभारगाव, डाळज, डिकसळ, कोंढार चिंचोली या भागांत पाणी उथळ झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार झाले आहेत.

साहजिकच आतापर्यंत तुलनेने कमी असलेल्या विविध जातींच्या पक्ष्यांनी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा उजनीकडे मोठ्या संख्येने आपला मोर्चा वळविला आहे. थवेच्या थवे उजनीत डेरेदाखल होताना दिसत आहेत. यामध्ये प्लेमिंगो पक्ष्यांनी अधिकची भर टाकल्याने उजनीकाठ बहरून निघाला आहे.

त्याचबरोबर पट्ट कदंब, ब्राह्मणी बदक, ग्रे हेरॉन, चित्रबलाक, पानपाकुरडी, सराटी, थापट्या, चमचचोच्या, हळदी-कुंकू अशा नानाविध जातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट कमालीचा वाढल्याचे कुंभारगाव येथील पक्षिप्रेमी दत्ता नगरे यांनी सांगितले. गेल्या महिन्यात पर्यटकांना पक्षी पाहण्याचा अपेक्षित आनंद घेता आला नाही. मात्र, आता पक्ष्यांची पाणवठ्यावर अक्षरशः शाळा भरल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT