Latest

चीनला पुन्‍हा ‘कोरोना भया’ने ग्रासले, रुग्‍णाच्‍या मृत्‍यूनंतर क्वॉरंटाईनचे नियम अधिक कडक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणाने एका रुग्‍णाचा मृत्यू झालेल्या नोंद झाली आहे. मागील सहा महिन्‍यातील हा पहिला कोरोना बळी ठरला आहे. काेरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ होत असताना रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याने चीनमधील प्रशासन भयग्रस्‍त झाले आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी 'झिरो कोविड पॉलिसी' सुरू केली आहे. देशातील काही भागात लॉकडाऊन करण्यात आले असून, तपासण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. क्वॉरंटाईनचे नियमही अधिक कडक करण्यात आले आहेत.

ग्वांग्झु महानगरात परिस्थिती गंभीर

कोविड संक्रमणाने मृत्यू झाल्याच्या घटनेची नोंद चीनची राजधानी बीजिंगमध्‍ये  झाली आहे. येथील शहर नियमन अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाने मृत्यू झालेली व्यक्ती ही ८७ वर्षाची वयोवृद्ध होती. राष्ट्रीय आरोग्य संघटनेने म्‍हटलं आहे की, चीनमध्ये गेल्या २४ तासात २४००० नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. एका रिपोर्टनुसार, चीनमधील दक्षिण ग्वांग्झु या महानगरात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढल्याने येथील परिस्थिती गंभीर आहे. कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी या भागात अडीच लाखांहून अधिक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

निर्बंध लावल्याने चीन नागरिकांमध्‍ये असंतोष

जगातील अमेरिका आणि अन्य देशाच्या तुलनेत चीनमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण जरी कमी असले तरी चीनकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. याठिकाणी प्रशासनाकडून कोरोना संक्रमित रूग्णांना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन केले जात आहे. वारंवार सरकारी, खासगी कार्यालये, शाळा बंद ठेवले जात आहे. चीनमध्ये कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात येत आहेत. यामुळे चीन नागरिकांच्या मनात शासन आणि प्रशासनाविरूद्ध असंतोष वाढला आहे. काही ठिकाणी तर नागरिक लावलेले निर्बंध झुगारून देताना दिसतात, तर काहीजण सोशल मीडियावर याचा तीव्र निषेध करताना दिसत आहेत. नागरिकांच्यातील हा असंतोष बघून प्रशासनाने काही नियम आणि निर्बंधामध्ये शितिलता आणली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT