Latest

ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याचा महिला कामगारांवर डोळा; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे बारामतीत खळबळ

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती नगरपरिषदेत आरोग्य विषयक कामे घेणाऱ्या ठेकेदाराकडील एका कर्मचाऱ्याने महिला कामगारांविषयी अश्लिल संभाषण करत या महिलेची मागणी करणारी ऑडिओ क्लिप बारामतीत व्हायरल झाली आहे. यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोरगरीब, असहाय्य महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. उपलब्ध ऑडिओ क्लिपची बारामतीत सोमवारपासून जोरदार चर्चा आहे.

राज्यात बारामती नगरपरिषदेचा नावलौलिक असताना गोरगरीब महिलांच्या बाबतीत ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याकडून होणारी गळचेपी चीड आणणारी आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या पर्यवेक्षक व कामगारांमध्ये यासंबंधीचा संवाद झाला आहे. स्वच्छता काम करणाऱ्या काही महिलांपैकी कोण सुंदर दिसते, अमक्या महिलेवर डोळा असून कोणत्याही परिस्थितीत ती हवी आहे, अशी मागणी केल्याचे त्यात आढळून आले आहे.

यासंबंधी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची मागणीही केली आहे. परंतु यानिमित्ताने ठेकेदार कंपन्या व त्यांच्याकडे काम करणारे पर्यवेक्षक, कामगार येथील असहाय्य, परिस्थितीने गांजलेल्या महिलांचा कसा फायदा घेतात, हे उघड झाले आहे. पालिकेसंबंधी घडलेला हा काही पहिलाच प्रकार नाही. परंतु या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याने ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलांची नावेही या क्लिपमध्ये घेण्यात आली आहेत.

यासंबंधी पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्यात आली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमधील दोघांनाही कामावर येवू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. पालिकेचा यात संबंध नाही. ठेकेदाराकडून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईल.

SCROLL FOR NEXT