Latest

मालवणातील जलक्रीडा प्रकल्पाची चर्चा गोवा विधानसभेत

मोहन कारंडे

पणजी; योगेश दिंडे : गोव्याच्या विधानसभा अधिवेशनात सध्या मालवण समुद्रकिनारी भागातील जलक्रीडा व्यवसायांची चर्चा सुरू आहे. दस्तुरखुद्द पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीच कामकाजादरम्यान मालवणातील जलक्रीडा प्रकल्प, व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या स्पर्धेचा उल्लेख केला आहे. गोव्यात जलक्रीडा प्रकारांत दलालांची वाढती संख्या पर्यटनवृद्धीस मारक ठरू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गोव्यात जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रतेसाठी नवे नियम केल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

सध्या गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 31 मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. राज्याच्या हितासाठी व्यावसायिकांनी सरकारचे धोरण स्वीकारावे, असे आवाहन पर्यटनमंत्री खंवटे यांनी गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांना केले आहे. राजकीयद़ृष्ट्या व पर्यटनाच्या माध्यमातून मालवणचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झालेले आहे. मालवणात घडणार्‍या विशेष घटनांची नोंदही आवर्जून घेतली जाते. मात्र, मालवण समुद्रकिनारी भागात जलक्रीडा प्रकल्पांची वाढती संख्या व तेथील विविध प्रकारचे दर गोव्याच्या तुलनेत कमी आहेत. व्यावसायिक स्पर्धेमुळे मालवणातील जलक्रीडा प्रकारांमध्ये पर्यटकांसाठी आकर्षक पॅकेजेस ठेवली जात आहेत. या पॅकेजमध्ये माफक दरात जेवणाची, राहण्याची, बोटिंगची, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे खास लक्ष वेधले.

गोव्याला पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. मात्र, जलक्रीडा प्रकारांत दलालांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात गोव्यात येणारे पर्यटक सिंधुदुर्गकडे वळतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. गोव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत देशी-विदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. पंचतारांकित हॉटेल्स आहेत. मात्र, सिंधुदुर्गातही पर्यटनक्षेत्राचा गतीने विकास होत आहे. पर्यटन क्षेत्रातील दलाली वेळीच रोखली नाही तर देशी पर्यटकांप्रमाणेच विदेशी पर्यटकही सिंधुदुर्गचा पर्याय निवडू शकतात. यासाठी सरकारच्या पर्यटन धोरणातील बदल व्यवसायामध्ये नियमितता आणू शकतात, असे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.

गोव्यात पर्यटकांची लूट…

गोव्यात किनारी भागात दलालांचा सुळसुळाट आहे. 450 रुपयांच्या पॅराग्लायडिंगसाठी 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत दर आकारले जातात. वर्षअखेरीस तर पर्यटकांची गर्दी असते त्यावेळी ही रक्कम तर आणखी वाढते. यामुळे पर्यटकांची लूट होत असल्याची कबुली पर्यटनमंत्री खंवटे यांनी दिली आहे. या व्यवसायातील बेकायदा दलाली संपविण्यासाठी जीईएल (गोवा इलेक्ट्रॉनिक्स लि.) अंतर्गत नोंदणी आणि नियमितीकरण सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोहर विमानतळामुळे सिंधुदुर्गला लाभ

सिंधुदुर्गला जोडून असलेल्या गोवा राज्याच्या पेडणे तालुक्यात मोप येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाला आहे. याचा लाभ सिंधुदुर्गमधील पर्यटन व्यावसायिक उठवू लागले आहेत. या बदलाची चिंता गोव्यातील व्यावसायिकांना सतावत आहे. गोव्याच्या तुलनेत शिरोडा वेळागर, मालवण, तारकर्ली, देवबाग समुद्रकिनारी मोठी गर्दी नसते. विदेशी पर्यटक कमी गर्दीच्या ठिकाणी शांतता अधिक मिळत असल्याने अशी ठिकाणे पसंत करतात.

SCROLL FOR NEXT