Latest

मविआतील जागावाटपाचा निर्णय आठवडाभरात होणार

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आठवडाभरात महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित केले जाणार आहे. याबाबत शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींशी चर्चा केल्याने या प्रक्रियेला वेग मिळाला आहे.

जागावाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर 27 व 28 फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ एकत्रपणे निवडणुका लढवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हेही आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यांनी मांडलेल्या जवळपास सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याचेही चेन्नीथलांनी स्पष्ट केले.
जागावाटपाच्या सूत्राला अंतिम स्वरूप देण्याची गरज असल्याचे मत आंबेडकरांनी व्यक्त केले. त्यांचे ठरले की आमचे ठरेल, असेही ते म्हणाले. जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले असून वंचितला नांदेड, जालना, सोलापूर, अकोला या चार जागा सोडल्या जाऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

SCROLL FOR NEXT