Latest

आईला फाशी देण्यासाठी मुलीला केले ‘जल्लाद!’, इराणमधील शिक्षेचा अजब प्रकार

दिनेश चोरगे

तेहरान; वृत्तसंस्था :  इराणमध्ये एका महिलेला तिच्याच मुलीकरवी फासावर चढविण्यात येऊन इराणी कायद्यान्वये शिक्षा देण्यात आली. मृत्युदंड झालेल्या महिलेचे नाव मरियम करीमी असून 13 वर्षांपूर्वी मरियम हिने पित्याच्या मदतीने पतीची हत्या केली होती. मरियमच्या पित्यालाही फाशीची शिक्षा जाहीर झाली होती; पण ती भोगण्यापूर्वीच तो मरण पावला.

आईला फासावर चढविण्यासाठी जल्लादाची भूमिका पार पाडण्याची दुर्दैवी वेळ ओढविलेल्या लेकीला 13 वर्षे आपल्याला आई-बाप आहेत की नाही, हेही माहिती नव्हते. ती 6 वर्षांची होती तेव्हापासूनच पैतृक आजी-आजोबांकडे राहात होती. आजी-आजोबांनी तिला तिच्या आई-बाबांबद्दल ते मरण पावलेत, या व्यतिरिक्‍त काहीही सांगितले नव्हते. इराणमध्ये प्रकारानुसार खुनाच्या शिक्षेच्या वेगवेगळ्या तर्‍हा आहेत. जगभरातील मानवाधिकार संघटनांनी त्या रद्द ठरविण्याच्या मागण्या वारंवार केल्या आहेत. पण इराण ऐकायला तयार नाही.
'इराण वायर'च्या वृत्तानुसार मरियम हिला बुरख्यातच फाशीच्या तख्तापर्यंत आणले गेले. गळ्यात फास टाकला आणि मरियमच्या मुलीला मरियम उभी असलेल्या खुर्चीला लाथ मारायला सांगण्यात आले. कारागृह आणि स्थानिक प्रशासनाच्या दबावात मुलीने खुर्चीला लाथ मारली.

काय होते प्रकरण…

लग्‍नानंतर मरियमचा नवरा तिचा सातत्याने छळ करत असे. मरियमचे वडील इब्राहिम यांनीही जावयाला अनेकदा समज दिली. मरियमला अनेकदा उपाशी डांबून ठेवण्यात येत असे. मरियमला फारकत देण्यासही तो तयार नव्हता. मरियमने अखेर वडील इब्राहिम यांच्या मदतीने त्याची हत्या केली. तेव्हा मरियमची मुलगी अवघ्या 6 वर्षांची होती.

मरियम प्रकरणात काय झाले?

इराणच्या कायद्यानुसार मृताचे निकटवर्तीय खुन्याला माफ करू शकतात. दोषी अथवा पीडिताचा निकटवर्तीय अज्ञान असेल, तर शिक्षेची कारवाई करण्यासाठी तो सज्ञान होण्याची वाट बघितली जाते. मरियमच्या प्रकरणात मुलगी आईला क्षमा करू शकत होती. पण प्रशासनाने काय घोळ केला हे कळेनासे आहे, असे 'द मिरर' या दैनिकाने म्हटले आहे. दुसरीकडे 'द सन'च्या वृत्तानुसार मुलीने आईला क्षमा करण्यास नकार दिला होता.

SCROLL FOR NEXT