चाकण : पुढारी वृत्तसेवा : स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून ३२ वर्षीय सुनेने ७१ वर्षीय सासूचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला आहे. ही घटना चाकण (ता. खेड) येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा अशोक मुळे (वय ७१, रा. पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून करण्यात आलेल्या सासूचे नाव असून सुवर्णा सागर मुळे (वय ३२, रा. झित्राईमळा, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सासू सुषमा, आरोपी सून सुवर्णा आणि पती हे एकत्र राहतात. सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. सुवर्णा हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. त्याला सोडून सासू सुषमा शेजारी गप्पा मारत बसायची. मुलाला वेळेवर जेवण देत नसल्याचा सुनेची भावना होती. यावरून देखील सासू-सुनेत अनेकदा वाद झाले. सासू सुषमा यांना फिट, शुगर आणि बीपीचा आजार होता. सुवर्णाचा पती कामावर गेल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा स्वयंपाक बनवण्यावरून दोघींमध्ये वाद झाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हाच सुवर्णा हिने नायलॉन दोरी घेऊन सासूचा गळा आवळला.
सासू बेशुद्ध झाल्याचे पाहून पतीला फोन करून सुवर्णा हिने त्याला बोलावून घेतलं. आईला फिट आली आणि त्या बेशुद्ध झाल्या एवढंच सांगून सासूला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथं सुषमा यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी चाकण पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात घेऊन सुनेची विचारपूस केली. त्या फिट येऊन बेशुद्ध पडल्या, एवढंच आरोपी सून सांगत होती. अखेर, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचं पुढे आलं अन आरोपी सुनेला चाकण पोलिसांनी शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. चाकणचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे याबाबत तपास करीत आहेत.