Latest

राज्यात थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह कोकणात प्रभाव अधिक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीचा कडाका वाढल्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी औरंगाबादचे किमान तापमान राज्यात नीचांकी म्हणजेच 9.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले, तर जळगाव 10 आणि पुणे 10.9 अंश सेल्सअसवर गेल्याने या भागात तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणात देखील थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात गेल्या आठवड्यापासून तीव्र थंडीची लाट आली आहे. तसेच सकाळी दाट धुके, यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम यांसह ईशान्य भारतातील सर्वच राज्यांत थंडीने थैमान घातले आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी, राज्यात थंडीचा कडाका दोन दिवसांपासून वाढू लागला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान हे 14-15 डिग्री, तर कमाल तापमान हे 26-29 डिग्री यादरम्यान जाणवत असून, ते सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्रीने कमी आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. उत्तर भारतातील थंडी राजस्थान, गुजरातमार्गे कोकणात उतरत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही थंडीचा प्रभाव आहे. परंतु, त्यामानाने तो काहीसा कमी आहे.

मात्र, पुढील 5 दिवस थंडीचा हा प्रभाव कायम असेल, असे दिसते. कोकणाबरोबर राज्यातील खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यांतही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावले असून, काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते. उर्वरित राज्यातील जिल्ह्यांत कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरीदेखील येत्या काही दिवसांत थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT