नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोना विरोधी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाला आणखी वेग देण्याची तयारी केंद्र सरकारकडून केली जात आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांना बूस्टर डोस घेण्यासाठी ठेवण्यात आलेले अंतर नऊ महिन्यांवरून कमी करीत सहा महिन्यांवर आणण्याचा विचार सरकार करीत आहे. दुसरा डोस आणि बूस्टर डोस दरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाकडून (एनटीएजीआय) शिफारस केल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. उद्या, शुक्रवारी (दि.२९) एनटीएजीआय ची बैठक होणार असल्याचे कळतेय. या बैठकीत यासंबंधी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोरोना विरोधी लसीच्या दोन डोससह, प्राथमिक लसीकरणाच्या जवळपास सहा महिन्यांनी शरीरातील अँटीबॉडीची पातळी कमी होते. असे आयसीएमआर तसेच इतर आंतरराष्ट्रीय शोध संस्थांच्या अभ्यासातून समोर आले आहे. बूस्टर डोस घेतल्याने महारोगराई विरोधात शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वृद्धींगत होते, असे देखील अभ्यासातून समोर आले आहे. १८ वर्षांहून अधिक वयोगटातील ज्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे, अशांना नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर खबरदारी म्हणून बूस्टर डोससाठी पात्र ठरवण्यात आले आहे. पंरतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास तसेच निष्कर्षांच्या आधारे हे अंतर कमी केली जाण्याची शक्यता आहे.
देशात १० जानेवारीपासून आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सला बूस्टर डोस देण्यात येत आहेत. मार्च महिन्यापासून ६० वर्षांहून अधिक वयोगटातील वृद्धांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २ कोटी ७४ लाख ८८ हजार ४८४ बूस्टर डोस देण्यात येत आहेत. पंरतु, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बूस्टर डोसचा वेग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. अशात एनटीएजीआयच्या शिफारसीनंतर लसीकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी ४७,५५,८७२
२) फ्रंटलाईन वर्कर्स ७४,९५,३८३
३) १८ ते ४४ वयोगट १,२३,१७३
४) ४५ ते ५९ वयोगट ४,४१,१६८
५) ६० वर्षांहून अधिक १,४६,७२,८८८