Latest

‘बिद्री’ पुन्हा राज्यात भारी; या वर्षीच्या ऊसाला उच्चांकी ३४०७ रूपये दर जाहीर

निलेश पोतदार

बिद्री ; पुढारी वृत्तसेवा कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला उच्चांकी ३४०७ रूपये दर जाहीर केला आहे. कारखान्याचे माजी आमदार व नूतन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज (शुक्रवार) या दराची घोषणा केली. हा दर राज्याच्या साखर कारखानदारीतील सर्वाधिक असल्याचे समजते. के. पी. पाटील यांनी नुतन संचालकांच्या पहिल्याच बैठकीत उच्चांकी दर जाहीर करून उस उत्पादकांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, निवडणुकीदरम्यान कारखान्याच्या प्रशासनाने ३२०० रुपये प्रतिटन उसदर जाहीर केला होता. यामध्ये २०७ रूपयांची वाढ करुन यंदा प्रतिटन ३४०७ रुपये असा उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची 'एफआरपी ' प्रतीटन ३१९४ रूपये २९ पैसे बसते. त्यामुळे प्रशासनाने दर ३२०० रूपये जाहीर केला. त्यामध्ये अधिक टनास २०७ रुपये देण्यात निर्णय घेण्यात आला आहे. सध्या उसाला प्रतीटन ३२०० प्रमाणे देण्यात येणार असून; गळीत हंगाम समाप्तीनंतर दोन टप्प्यात उर्वरीत रक्कम देण्यात येणार आहे. उस उत्पादक सभासदांनी कारखान्याला अधिकाधिक उस पुरवठा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नुतन उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, चीफ अकौंटंट एस. ए. कुलकर्णी, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT